
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
नवीन शैक्षणिक वर्षाला 13 जूनपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी शाळा दुरुस्ती व वर्गखोल्यांना निधी मंजूर झाला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या 173 प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी. आणि 83 वर्गखोल्यांसाठी 3 कोटी 94 लाख 56 हजार 921 रुपये मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे निदान यावर्षी दुरुस्ती होणार आहे.
दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची दुरवस्था होत चालली आहे. खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असले तरी मोडकळीस आलेल्या जिल्हाभरातील अनेक शाळांच्या दुरुस्तीसाठी तसेच नवीन वर्गखोल्यांसाठी शासनाकडून निधी मिळत नव्हता. याआधी शाळांच्या गरजेनुसार नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी सर्वशिक्षा अभियानातून निधी मिळत होता. मात्र, या अभियानातून बांधकामासाठी निधी देण्याचे मागील तीन वर्षांपासून बंद करण्यात आले. त्यामुळे आता नवीन वर्गखोल्या जिल्हा वार्षिक योजनेतून घेण्यात येतात.
शाळांच्या वर्गखोल्यांसाठी निधी मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा सुरू होता. मात्र, निधी उपलब्ध झालेला नव्हता. त्यामुळे सुरू पावसाळ्यामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना गळक्या, नादुरुस्त वर्गखोल्यांमध्ये धडे गिरवावे लागत आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसाठी 83 नवीन वर्गखोल्यांसाठी आणि 173 शाळांच्या दुरूस्तीसाठी 3 कोटी 94 लाख 56 हजार 921 रुपये जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त झाले आहेत. या वर्गखोल्यांची जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून कामे करण्यात येणार आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेकडून प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरुन पुढील शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना या नवीन आणि सुरक्षित इमारतीमधील वर्गामध्ये शिक्षणाचे धडे घेता येणार आहेत.
तालुका दुरुस्तीसाठी मंजूर शाळा
मंडणगड 02
दापोली 08
खेड 16
चिपळूण 29
गुहागर 09
संगमेश्वर 28
रत्नागिरी 26
लांजा 40
राजापूर 15
एकूण 173