सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा
सार्वजनिक बांधकाम विभागाने आंबोली घाटमार्ग अद्याप रस्ते महामार्ग विभागाकडे वर्ग केला नाही. तरीही रस्ते महामार्ग विभागाने गेल्या चार दिवसांपासून घाटात दरडींना ड्रिल करण्यास सुरुवात केली आहे. संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्गाचा आराखडा तयार झाला आहे.
हा महामार्ग आंबोली घाटातूनच जाणार आहे. त्यासाठी वनविभागाची परवानगी घेणे गरजेचे आहे. ऐन पावसाच्या तोंडावर घाटातील दरडींवर ड्रिल करण्यात येत असून या कामाची परवानगी कोणी दिली? असा सवाल उपस्थित होत आहे.

संकेश्वर-बांदा महामार्गाचा आराखडा राष्ट्रीय रस्ते महामार्ग विभागाकडून तयार करण्यात आला आहे. संकेश्वरपासून आजरा फाट्यापर्यंतच्या कामाची निविदा काढण्यास केंद्राकडून मंजुरीही देण्यात आली आहे. असे असले तरी आंबोलीपासून पुढे माडखोलपयर्ंतच्या रस्त्याचे सर्वेक्षण सुरू आहे. तर हा महामार्ग आंबोली घाटातून जाणार हे निश्चित असले तरी आंबोली घाट रस्ता वनविभागाच्या अखत्यारित येत असल्याने वनविभागाकडून परवानगी घेणे महामार्ग विभागाला बंधनकारक आहे.

मध्यंतरी महामार्ग विभागाने सिंधुदुर्ग वनविभागाकडे तशी परवानगी मागितली होती. पण ही परवानगी नागपूर येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून नाकारण्यात आली होती. तसेच महामार्ग आंबोली घाटातूनच करा पण घाटमार्गाच्या मूळ ढाच्याला कोणतीही बाधा न आणता करण्यात यावा, असे या पत्रात म्हटले होते. त्यानंतर काही काळ काम थांबविण्यात आले होते.

अलिकडेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांनी पुन्हा वनविभागाकडे परवानगीसाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. पण अद्याप परवानगी देण्यात आली नसली तरी महामार्ग विभागाकडून आंबोली घाटात काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे हा घाटमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे ही हस्तांतरित करण्यात आला नसताना हे काम सुरू करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

वनविभागाचा कारभार रामभरोसे!

आंबोली घाट पावसाळ्यात धोकादायक असतो. या घाटातून अवजड वाहनेही सोडली जात नाहीत. असे असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सर्व नियम धाब्यावर बसवत घाटातील दरडींना ड्रिल मारण्यात येत आहे. त्यामुळे घाट मार्गाला हादरा बसून ऐन पावसाळ्यात हा घाटमार्ग धोकादायक बनल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल आहे. एकीकडे हे ड्रिल पावसात दरडी कोसळू नये यासाठी उभारण्यात येत असले तरी विशेष म्हणजे वनविभागाकडून याला कोणतीही हरकत घेण्यात आली नाही. त्यामुळे आंबोली घाट मार्गाचे सोयरसुतक कोणाला नसल्याचे यातून दिसून येते.

31 मे ला उपवनसंरक्षक शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक इस्माईल जालगांवकर हे दोघेही निवृत्त झाले असून त्यांचा पदभार चिपळूण येथील विभागीय वन अधिकारी दीपक खाडे व वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे. खाडे यांनी अद्याप या पदाचा कार्यभार घेतलेला नाही तर अमृत शिंदे हे मुंबई येथे प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे वनविभागाचे काम रामभरोसे बनले आहे.

बांधकामकडून आंबोली घाटमार्ग वर्ग नाही

राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जरी आंबोली घाटात दरडींना ड्रिल करण्यात येत असले तरी अद्याप घाटमार्ग बांधकामकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग केला नसल्याचे सा. बां. विभाग सावंतवाडीच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here