दापोली ः पुढारी वृत्तसेवा : पर्यावरण व गडकिल्ले संवर्धनाच्या कृतीमधून छत्रपती शिवाजी महाराज यांचेवरील प्रेम व्यक्‍त करा, असे आवाहन रामराजे कॉलेज दापोलीचे प्रा. कुणाल मंडलिक यांनी केले.

दापोली वराडकर बेलोसे महाविद्यालयात आयोजित ‘शिवस्वराज्य दिन’ कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्‍ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सभापती जानकी बेलोसे होत्या. त्यांच्या हस्ते दापोली शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवज्योत रॅलीची सुरुवात करण्यात आली. ही रॅली केळस्कर नाक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून वराडकर-बेलोसे महाविद्यालयापर्यंत काढण्यात आली.

यावेळी संस्थेच्या सुनीता बेलोसे, गणेश केळकर, अनंत सणस, श्रीकांत मुंगशे, शिवाजी शिगवण इत्यादी विश्‍वस्त उपस्थित होते. तसेच शिवज्योत रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय कॅडेट कोरचे विद्यार्थी, कार्यवाह डॉ. दशरथ भोसले, प्राचार्य डॉ. भारत कर्‍हाड, प्रा. उत्तमराव पाटील, प्रा. एस. एस शिंदे, राजेंद्र देवकाते, डॉ. एल. एस. सीताफुले, यांनी सहभाग घेतला. नीळकंठ गोखले यांनी पोवाडा गायन केले, तर प्रसन्नकुमार चिंदे यांनी शिवस्वराज्यभिषेक सोहळ्याचे वर्णन केले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here