
खेड : पुढारी वृत्तसेवा
कोकण रेल्वेतून प्रवास करणार्या रोहा येथील युवकाचा मंगळवारी दि. 7 रोजी पहाटेच्या सुमारास खेड तालुक्यातील वेरळ खडकवाडी येथे रेल्वेतून पडून मृत्यू झाला. सकाळी 9.45 ते 10 वाजण्याच्या सुमारास रेल्वे ट्रॅक शेजारी छिन्नविच्छिन्न अवस्थेमध्ये या तरुणाचा मृतदेह आढळून आला.
या बाबत माहितीनुसार माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील रोहा येथील मोरे वसाहतीत राहणार विनोद तय्याप्पा क्षीरसागर (27) या तरुणाचे वडील मुंबई येथे उपचारार्थ दवाखान्यात दाखल असून हा तरुण मुंबईतून रोहा असा रेल्वेतून प्रवास करत असावा. मात्र, झोप लागल्याने तो रेल्वेतून कोकण रेल्वे मार्गावर पुढे आला, असल्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील वेरळ गावानजीक रेल्वेतून एक प्रवासी रेल्वेतून पडल्याचे समजताच मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी, अभिषेक डेरवणकर, पोलीस पाटील संजय शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. प्रसाद गांधी यांच्या प्रसिद्धी रुग्णवाहिकेने मृतदेह कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. तेथे त्याची ओळख पटवण्यात आली. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह नेण्यात आला आहे.