
गुहागर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील धोपावे येथे दारुबंदीसाठी काही महिलांनी दबाव झुगारून आवाज उठविला आहे. या संदर्भात नुकतीच या महिलांनी पोलिस निरीक्षक व तहसीलदार यांची भेट घेत दारुबंदीची मागणी केली आहे.
धोपावे गावात मच्छीमार समाजाची संख्या जास्त आहे. या ठिकाणी मद्यप्राशन करणार्यांचे प्रमाण जास्त आहे. मोठ्यांप्रमाणेच नववी-दहावीतील मुलेही या व्यसनाच्या आहारी जात असल्याची गंभीर बाब या महिलांनी निदर्शनास आणून दिली. समाजातील पुरुषांचा दारूबंदीला विरोध आहे. मात्र, हा विरोध झुगारून दहा ते पंधरा महिलांनी थेट गुहागर गाठून तहसीलदार प्रतिभा वराळे व पोलिस अधिकारी यांची भेट घेत धोपावेतील स्थितीबाबत सांगितले.
या महिला म्हणाल्या की, यावर्षी शिमगोत्सवादरम्यान काही मंडळीनी पहिली, दुसरीतील मुलाला शीतपेयातून दारु पाजली. घरी येऊन काही मुले बेशुद्ध पडली. काहींना चक्कर येत होती. काहींनी उलट्या केल्या. त्यावेळी समजले मुले गावठी दारू पिऊन आली आहेत. पोलिसांकडे तक्रार केली की काहीकाळ धंदा बंद करतात. त्या काळात भलताच कोणीतरी दारूची विक्री करतो. हे सगळे थांबले नाही तर पिढी बरबाद होईल. आमच्या घरात संघर्ष पेटेल, आमचे संसार उघड्यावर येतील. त्यामुळे गावातून दारूला हद्दपार करा, अशी मागणी या महिलांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन उपसरपंच अभिलाशा गुढेकर, सुनिता जाधव, ग्रा.पं. सदस्या दर्शना पावस्कर, अपूर्वा संसारे, विनिता गुढेकर, संजीवनी गुडेकर, आशिकी जाधव, मत्स्यगंधा गुढेकर, सुगंधी नाटेकर, संचिता सुर्वे आणि जोत्स्ना नाटेकर यांनी तहसीलदार व पोलिस प्रशासनाला दिले आहे.