
माणगाव; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ तालुक्यातील आंजिवडे गावातील संतोष सोमा कदम या मनोरुग्ण तरुणाने तेथीलच कृष्णा शंकर भोगले (वय 84), लक्ष्मी कृष्णा भोगले (80) या दाम्पत्यावर काठीने, तर अंगणवाडी सेविका वैभवी विजय पंदारे यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुडाळ पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी स्वतः घटनास्थळी जात ग्रामस्थांच्या मदतीने हल्लेखोर संतोष कदमला ताब्यात घेत. त्याला रत्नागिरी येथील मनोरुग्ण रुग्णालयात पाठवून देण्यासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन केले.
संतोष कदम हा मनोरुग्ण असून, गेले वर्षभर तो गावातील नागरिकांना त्रास देत आहेे. कधी रस्ता खोदून टाकणे, कधी रस्त्यावर मोठे दगड ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, असे प्रकार संतोषकडून होत होते. बुधवारी, 8 जून रोजी त्याने प्रथम आंजिवडे -भाकरवाडी येथील कृष्णा शंकर भोगले यांच्या घरात अचानक प्रवेश करत लक्ष्मी भोगले यांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलेले कृष्णा भोगले यांच्यावरही त्याने काठीने जोरदार हल्ला केला. यावेळी भोगले कुटुंबीयांनी आरडाओरडा करताच हल्लेखोर संतोष कदम पळून गेला.
याबाबत माणगाव पोलिस स्थानकात पोलिस पाटील नारायण पंदारे यांनी तक्रार दिली होती. दरम्यान, गरुवारी 9 जून रोजी सकाळी अंगणवाडी सेविका वैभवी विजय पंदारे ही आपल्या तीन वर्षांच्या मुलासह अंगणवाडीत कामावर आली होती. दरम्यान, संतोष कदम याने तिच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ती संतोष कदम याच्या तावडीतून थोडक्यात बचावली.
या घटनेची पोलिस पाटील श्री. पंदारे यांनी माणगांव पोलिसांना कल्पना देताच पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे स्वतः आंजिवडे गावात टीमसह हजर झाले. हल्लेखोर संतोष कदम याला पकडण्यासाठी ग्रामस्थ व पोलिस त्याच्या घरी गेले असता हल्लेखोर तरुण व त्याचे आई-वडील घरात कडी लावून बसले. पोलिसांनी संतोष याला बाहेर येण्याची विनंती केली. मात्र, आतून दरवाजाची कडी उघडली नाही. अखेर दर्शनी बाजुकडील दरवाजा तोडून ग्रामस्थांच्या उपस्थितीत हल्लेखोर संतोष कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर संतोष कदम याला नातेवाईकांच्या ताब्यात देत रत्नागिरी येथील रुग्णालयात दाखल करण्याबाबत सूचित केले. पोलिसांच्या उपस्थितीत हल्लेखोर संतोष कदम याला गावातून हलविल्यानंतर आंजिवडेवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. माणगांव पोलिस दूरक्षेत्रचे ठाणे अंमलदार मंगेश जाधव, सरपंच अजित परब यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.