रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : शहरात हेल्मेट सक्‍तीच्या विषयानंतर आता वाहन पार्किंगचा विषय ऐरणीवर आला आहे. वाहतूक पोलिस मुख्य रस्त्यावरील वाहतूक बाजूला ठेवून जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन वाहनचालकांवर कारवाई करताना दिसत आहेत. याबाबत वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. वाहतूक पोलिसांचे काम पावती फाडण्यापुरतेच उरले आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील हेल्मेट सक्‍तीचा विषय जोरदार गाजला होता. हेल्मेट सक्‍तीवरून काही सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांनीही याला विरोध दर्शवला होता. हे प्रकरण अगदी मंत्र्यांपर्यंत जाऊन पोहोचले होते. शेवटी यावर पडदा टाकण्यात आला. शहरात कारवाई करताना शिथिलता आणली गेली. हा विषय संपत नाही तोच आता वाहन पार्किंगचा विषय ऐरणीवर आला आहे.

वाहतूक पोलिसांनी सध्या नो-पार्किंगचा आधार घेत वाहन चालकांवर जोरदार कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुख्य रस्त्यावरील कारवाई केली जात असतानाच आता वाहतूक पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व जिल्हा परिषद आवारातही आपला मोर्चा वळविला आहे.

मुळात मुख्य रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्याऐवजी पोलिस कार्यालयाच्या आवारात जिथे गरज नसतानाही वाहन चालकांवर कारवाई करत असल्याचा अजब प्रकार घडताना दिसत आहे. वास्तविक या आवारात वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होत नाही. पोलिसांनी येथे का कारवाई करावी? याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

जिल्हा परिषद आवारात सध्या नूतन इमारतीचे काम सुरू आहे. त्यामुळे कार्यालयीन कामासाठी येणार्‍या ग्रामस्थांना वाहने कुठे लावायची? असा प्रश्‍न पडतो. सध्या आवारात जिथे जागा मिळेल तिथे वाहन पार्किंग केले जात आहे. मात्र, या गोष्टीला वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. वाहनांचे फोटो काढले जात आहेत. नो-पार्किंगमध्ये गाडी उभी केल्यामुळे दंडाची पावती फाडली जात आहे. बहुसंख्य वाहन चालकांना ही पावती मोबाईलवर येते. या सर्व प्रकाराबाबत वाहनचालकांमधून तीव्र नाराजी व्यक्‍त केली जात आहे. वाहतुकीला अडथळा होत नसेल तिथे वाहन लावूनसुद्धा कारवाई केली जात आहे. या पोलिसांच्या भूमिकेबाबत आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. त्यामुळे मूळ काम राहिले बाजूला फक्‍त पावत्या फाडण्यातच हे वाहतूक पोलिस गुंतल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here