
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : पोषणमूल्य आणि औषधी गुणधर्म असूनदेखील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पांरपरिक भातबियाण्यांची मागणी आता पुन्हा वाढू लागली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 700 किलो पांरपरिक भातबियाण्यांची विक्री झाली असून, अजून 500 किलो भातबियाण्यांची विक्री होण्याची शक्यता आहे. या वर्षी 100 हेक्टर क्षेत्रावर पारंपरिक भातबियाण्यांची लागवड होण्याची शक्यता आहे.
सुधारित आणि संकरित भातबियाण्यांच्या काळात पोषकता आणि औषधी गुणधर्म असलेली भातबियाणे नामशेष होण्याच्या मार्गावर होती. परंतु, गेल्या काही वर्षांत चुकीच्या आहार पद्धतीमुळे वाढलेले आजार, निर्माण झालेले विविध रोग आणि त्यांचे दिवसागणिक वाढत असलेले प्रमाण यामुळे पुन्हा एकदा लोकांना पांरपरिक तांदळाचे आहारातील महत्त्व पटू लागले आहे.
पांरपरिक 46 भातबियाणी संकलित करण्यात आली होती. त्यापैकी कोकणातील हवामानास अनुकूल अशी बियाणे सध्या सीड बँकेत विक्रीस ठेवण्यात आली आहेत. यामध्ये लाल, काळा आणि सफेद अशी बियाणी आहेत. काळा भात प्रतिकिलो 400 रुपये, लाल भात प्रतिकिलो 100 रुपये आणि सफेद भात प्रतिकिलो 50 रुपयेप्रमाणे विक्री सुरू आहे. वालय, घाटी पंकज, मोगरा, लाल वरगंळ, सोनफळ या पांरपरिक भातबियाण्यांची आतापर्यंत सातशे किलो विक्री झाली आहे.अजून पाचशे ते सहाशे किलो बियाण्यांची विक्री होईल, अशी अपेक्षा आहे. लाल तांदूळ असलेल्या भाताला शेतकर्यांकडून मोठी मागणी मिळत आहे.