
राजापूर; पुढारी वृत्तसेवा : रिफायनरी प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जमिनीच्या ड्रोन सर्वेक्षणाला गोवळपाठोपाठ शिवणे येथील ग्रामस्थांनीही तीव्र विरोध केला. त्यासाठी शिवणेवासीयांनी सुमारे 24 तास माळरानावर ठिय्या मांडला होता. दरम्यान, गुरुवारी राजापूरच्या प्रांताधिकारी वैशाली माने यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रशासन कोणतेही काम करणार नसल्याचे आश्वासित केल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
तालुक्यातील धोपेश्वर-बारसू परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पातील उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देण्याचे राज्य शासनाने केंद्र शासनाला आश्वासित केले आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहारही राज्य शासनाने केंद्र शासनाला केला आहे. त्यातून धोपेश्वर-बारसू परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पाची उभारणी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये ड्रोनद्वारे जमिनीचे सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणाला दोन दिवसांपूर्वी गोवळ येथील ग्रामस्थांनी आक्षेप घेत विरोध केला होता. त्यानंतर, शिवणे येथे सर्वेक्षण सुरू झाले. त्यालाही तेथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध करीत हे काम रोखून धरले.
या सर्वेक्षणासंबंधित सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी माळरानावर ग्रामस्थांनी बुधवारपासून ठिय्या मांडला होता. ग्रामस्थांचे हे आंदोलन गुरुवारी दुसर्या दिवशी सुरू होते. प्रांताधिकारी माने, तहसीलदार शीतल जाधव यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत डीवायएसपी निवास साळोखे, पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर उपस्थित होते. यापुढे ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रशासनाकडून कोणतेही काम केले जाणार नसल्याचे प्रातांधिकार्यांनी आश्वासित केले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतल्याची माहिती प्रकल्पविरोधी संघटनेचे अध्यक्ष बोळे यांनी दिली.