
सिंधुदुर्ग ; पुढारी वृत्तसेवा : कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी अखेर मान्सून तळकोकणात दाखल झाला. शुक्रवारी संपूर्ण जिल्हाभरात मान्सूनधारा कोसळल्या. कालपर्यंत कडक उन्हाळा सोसणार्या कोकणवासीयांना मान्सूनच्या आगमनामुळे थंडावा मिळाला आहे. वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे. दरम्यान, पुढील 3 ते 4 दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे.
यंदा अंदमान-निकोबार बेटावर पाच दिवस अगोदर आलेला मान्सून प्रत्यक्षात मात्र कोकणात पोहोचेपर्यंत त्याला खूप उशीर झाला. पुढील पाच दिवस कोकणात चांगली पर्जन्यवृष्टी होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सून कोकणात दाखल झाल्याची घोषणा शुक्रवारी केली.
27 मे पासून 9 जूनपर्यंत मान्सून गोव्याच्या दक्षिण सीमेवर म्हणजेच कर्नाटक सीमेवर थबकला होता. गेल्या अनेक वर्षांत असे पहिल्यांदा घडले होते की, मान्सून एकाच ठिकाणी तब्बल 12 दिवस थांबला होता. शुक्रवारी मात्र मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आणि तो गोवा ओलांडून तळकोकणात पोहोचला आहे.
जून महिन्याच्या 1 तारखेला मान्सूनची एन्ट्री केरळात होते आणि तळकोकणात पोहोचेपर्यंत पुढचे सात दिवस लागतात. म्हणजेच 7 किंवा 8 तारखेला मान्सून कोकणात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र मान्सून दोन ते तीन दिवसांनी उशिरा कोकणात दाखल झाला आहे.