
वैभववाडीः पुढारी वृत्तसेवा : सोनाळी वाणेवाडीनजीक सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रक व मोटारसायकलमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कोळपे मुस्लिमवाडी येथील बहीण भाऊ जागीच ठार झाले. मुख्तार महंमद थोडगे (वय १८) व मोमीना उस्मानगणी नावळेकर (वय २२) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात आज (दि.११) सकाळी ९.४५ च्या सुमारास घडला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. अपघातामुळे वैभववाडी उंबर्डे मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रक उंबर्डेहून वैभववाडीकडे येत होता. याच दरम्यान कोळपे येथील कॉलेज युवक मुख्तार थोडगे हा आपली विवाहित बहीण मोमीना नावळेकर (रा. नांदगाव) हिची तब्बेत बरी नसल्यामुळे वैभववाडी येथे मोटारसायकलवरून डॉक्टरकडे घेऊन जात होता. यावेळी सोनाळी वाणेवाडीनजीक ट्रक व मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले.
अपघाताची माहिती मिळताच वैभववाडीचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेऊन रस्ता वाहतुकीस खुल्ला केला. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच उंबर्डे कोळपे येथील मुस्लिम बांधवासह अन्य ग्रामस्थांनी गर्दी केली होती. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक तिथेच सोडून पळ काढला. अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.
मोमीन नावळेकर हिचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. तिचे नादगाव येथे सासर आहे. तिला दोन महिन्याची मुलगी आहे. तिची तब्बेत बरी नसल्यामुळे भावासोबत ती डॉक्टरकडे जात असताना काळाने तिच्यावर घाला घातला. तिची मुलगी आईविना पोरकी झाली आहे. तर भाऊ मुख्तार थोडगे हा वैभववाडी येथील कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविदयालयात बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई – वडील व भाऊ असा परिवार आहे.
बहीण भावाच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे कोळपे गावावर शोककळा पसरली आहे. मृतदेह वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले त्यावेळी नातेवाईक व कोळपे, उंबर्डे गावातील नागरिकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती.
हेही वाचलंत का ?