रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : पर्यटकांनी शहरातील रिक्षाचालकाला गुंगीचे औषध देऊन सुमारे एक लाखाला लुटल्याचा प्रकार घडला आहे. संबंधीत रिक्षाचालक पटवणे-साई मंदिर येथे बेशुद्धावस्थेत सापडला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अज्ञात तीन संशयीत पर्यटकांविरुद्ध जिल्हा रुग्णालयाच्या पोलीस चौकीत तक्रारीची नोंद करण्यात आली. ही घटना शनिवारी (ता.११) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. (Ratnagiri)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बेशुद्ध अवस्थेत असलेला रिक्षाचालक आशिष संजय किडये (२९, रा. धनजी नाका रत्नागिरी) हा नेहमीप्रमाणे स्वतःची रिक्षा घेऊन सकाळी आठच्या सुमारास श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे तीन पर्यटकांना घेऊन गेला. हे तीघे पर्यटक मुळचे कोल्हापूर येथील होते. त्यांना घेऊन गेल्यानंतर तो दुपारपर्यंत परत आलाच नाही. त्याचे वडील त्याला फोन करत होते, पण तो फोन उचलत नव्हता. त्यानंतर दुपारच्या सुमारास मारहाण व गुंगीचे औषध दिल्याने बेशुद्धावस्थेत असलेल्या आशिषला त्याच्या रिक्षासह परटवणे येथे आणून सोडण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याच्याकडील एक तोळ्याची सोन्याची चैन, हातातील दोन अंगठ्या, मोबाईल एटीएम कार्ड गायब झाले असल्याचे यावेळी समजले.

गणपतीपुळेहून येताना संशयित तीन पर्यटकांनी त्याला गुंगीचे औषध देऊन भंडारपुळे दरम्यान प्रसाद खाण्यास दिला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याला मारहाण करण्यात आली असून त्याच्या पायावर मारहाणीच्या खुणा दिसून येत आहेत. आशिष अद्यापही शुद्धीत नसल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here