
कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ तालुक्यात दुसर्या दिवशीही दमदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे तालुक्यात सुरू झालेल्या पेरणीच्या कामात आता पावसाचा जोर वाढल्याने व्यत्यय निर्माण झाला आहे. कुडाळ शहरात मुख्य रस्त्यावरील गटार उपसा न केल्यामुळे पहिल्याच पावसात सार्वजनिक बांधकाम विभागाचा पोलखोल झाला आहे. रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले.
शुक्रवारी पावसाचे प्रमाण काहीसे कमी होते. तर शनिवारी कुडाळ तालुक्यात पावसाचा जोर अधिकच वाढला होता. शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकर्यांनी भातपेरणीचे काम हाती घेतले होते. या पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत होते. शनिवारी तालुक्यात पावसाचा जोर अधिक वाढला. त्यामुळे भातपेरणीच्या कामात व्यत्यय आला आहे. जास्त पाऊस असताना पेरणी केल्यास भात कुजून वाया जाते. तसेच त्याची उगवण क्षमता घटत जाते. कुडाळ शहरात या पहिल्या पावसाने सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणाचा बोजवारा उडाला. शहरातील उद्यमनगर ते काळपनाका या भागातील गटर खोदाईकडे बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे शहरात पोस्ट ऑफीस नजिक रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. यामुळे पादचार्यांसह वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागला. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावरच पाणी साचले. तालुक्यात पहिल्या दिवशी 52 मी.मि. तर आतापर्यंत 9 मि.मी. लिटर पावसाची नोंद झाली आहे.