वैभववाडी ; पुढारी वृत्तसेवा : सोनाळी- वाणेवाडीनजीक सिमेंट मिक्सर ट्रक व मोटारसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कोळपे -जमातवाडी येथील बहीण भाऊ जागीच ठार झाले. मुख्तार महंमद थोडगे (18) व मोमीना उस्मानगणी नावळेकर (22) अशी या मयतांची नावे आहेत. शनिवारी सकाळी 9.45 वा. सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. या अपघातामुळे वैभववाडी- उंबर्डे मार्गावरील वाहातूक काही वेळ ठप्प झाली होती.

सिमेंट क्राँकीट मिक्सर ट्रक उंबर्डे ते वैभववाडी येत होता. याच दरम्यान कोळपे येथील कॉलेज युवक मुख्तार थोडगे हा आपली विवाहीत बहीण मोमीना नावळेकर (रा. नांदगाव) हीची तब्बेत बरी नसल्यामुळे तिला मोटारसायकलने वैभववाडी येथे डॉक्टरकडे घेऊन येत होता. सोनाळी- वाणेवाडीनजीक मिक्सर ट्रक व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात हे दोघेही बहीण- भाऊ जागीच ठार झाले. घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता. या अपघाताची खबर मयत अख्तार थोडगे यांचा आत्ये भाऊ मजीद उमर चोचे (रा. कोळपे) यांनी वैभववाडी पोलिसात दिली. यावरून अज्ञात ट्रक चालकावर भादिं वकलम 304 अ, 337,338,279,महाराष्ट्र मोटार वाहन 184,134,187 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करीत आहेत. अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस निरीक्षक अमीत यादव यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन रस्ता वहातुकीस खुला केला. दरम्यान अपघाताचे वृत्त समजताच उंबर्डे -कोळपे येथील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. अपघातानंतर चालकाने ट्रक तिथेच सोडून पळ काढला.

दोन महिन्यांचा मोमीन झाला पोरका

मोमीन नावळेकर हिचे नांदगाव येथील उस्मानगणी नावळेकर यांच्यांशी वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. तीन महिन्यांपूर्वी ती बाळंतपणासाठी माहेरी आली होती. तिला दोन महिन्याचा मुलगा आहे. तिची तब्बेत बरी नसल्यामुळे भावासोबत ती डॉक्टरकडे जात असताना काळाने तिच्यावर घाला घातला.तिच्या अपघाती निधनाने तिचा दोन महिन्यांचा मुलगा पोरका झाला. तर मुख्तार थोडगे हा वैभववाडी येथील कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविदयालयात बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. बहीण-भावाच्या या दुर्दैवी अपघाती निधनामुळे कोळपे गावावर शोककळा पसरली आहे. मृतदेह वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले त्यावेळी नातेवाईक व कोळपे, उंबर्डे गावातील नागरिकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here