खेड (रत्नागिरी) ; पुढारी वृत्तसेवा

कोकणातील नद्यांवर जलसंपदा विभागामार्फत अत्याधुनिक R.T.D.A.S. यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे नद्यांमधील पाणी पातळी, पर्जन्यमान यांच्याबाबतचे अचूक आकडे वेगवान पद्धतीने प्रशासनाला उपलब्ध होणार असून, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने कोकणासाठी ही यंत्रणा महत्वाचे काम करणार आहे.

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्यातील खेड , चिपळूण , राजापूर या ठिकाणी नद्यांना आलेल्या महापुरामुळे मोठी जीवितहानी झाली होती. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभाग ,जलविज्ञान प्रकल्प, नाशिकच्या माध्यमातून कृष्ण खोऱ्याच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यासाठी रियल टाइम डेटा सिस्टीम म्हणजेच R.T.D.A.S. यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ९ ठिकाणी ए.आर.एस म्हणजेच ऍटोमॅटिक रेन सोर्स स्टेशन आणि तीन ठिकाणी A.W.L.R म्हणजेच एटोमॅटिक वॉटर लेव्हल रेकॉर्ड सिस्टीम बसवण्यात आली आहे. खेड मधील जगबुडी नदी , चिपळूण येथील बहाद्दूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदी आणि राजापूर येथील अर्जुन नदी या तीन ठिकाणच्या नद्यांवर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे .

जलसंपदा विभागामार्फत एक लिंक देखील देण्यात आली असून, या लिंकवर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यातल्या तीन नद्यांच्या पाण्याची पातळी आणि नऊ ठिकाणच्या पावसाच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यात बसवण्यात आलेल्या या यंत्रणेचा वापर अत्यंत आवश्यक असून, या यंत्रणेमुळे नद्यांची पातळी वाढल्यास नदीच्या आसपासच्या गावांना तात्काळ अलर्ट देणे शक्य होणार आहे. एवढेच नाही तर पावसाचे प्रमाण वाढल्यास नियंत्रण कक्षेमार्फत नागरिकांना सतर्क करणे देखील आता सोपे व सहज झालं आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here