रत्नागिरी : दीपक शिंगण
भारतीय रेल्वेची पहिली-वहिली ‘भारत गौरव वातानुकूलित टुरिस्ट ट्रेन’ देशाची राजधानी दिल्ली ते नेपाळच्या जनकपूरपर्यंत दि. 21 जून रोजी धावणार आहे. ही रेल्वे रामायणाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देत त्यातून प्रवास करणार्‍या भाविकांना अनोख्या धार्मिक पर्यटन यात्रेची अनुभूती देणार आहे.

धार्मिक पर्यटन वाढीस लागावे, यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. आधुनिक सुविधांनी युक्त अशी ही पहिलीच वातातुकूलित ट्रेन ‘रामायण यात्रे’अंतर्गत मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामाशी संबंधित ऐतिहासिक तसेच धार्मिक ठिकाणांना भेटी देणार आहे. सर्वात आधी नेपाळमधील जनकपूर येथील जानकी मंदिरास पर्यटक भेट देतील. आख्यायिकेनुसार भगवान श्राीरामाचे जनकपूर हे विवाह स्थळ. याच ठिकाणी प्रभू रामांनी सीता माईंचा हात मिळविण्यासाठी शिवधनुष्य तोडले होते. ही विशेष वातानुकूलित गाडी आपल्या एकूण 18 दिवसांच्या धार्मिक यात्रेत 8 हजार किलोमीटरचे अंतर कापणार असून दिल्लीतील सफदरजंगहून दि. 21 जून रोजी रवाना झाल्यानंतर ती आधी नेपाळला जाणार आहे. याचबरोबर आपल्या पर्यटन सफरीत ही गाडी देशातील उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा तसेच आंध्र प्रदेश अशा आठ राज्यांनादेखील भेट देणार आहे. यात अयोध्या, बक्सर, जनकपूर, सीतामढी, काशी, प्रयाग, चित्रकूट, नाशिक, हम्पी, रामेश्वर, कांचीपूरम तसेच भद्राचलम या शहरांना भेट देत तेथील रामायणाशी संबंधित ठिकाणांची माहिती पर्यटकांना देणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here