
रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी, खेड, चिपळूण, राजापूर नगरपरिषद निवडणुकीतील अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभाग ठेवण्यासाठी सोडत काढण्यात आली. पिठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभांमध्ये या सोडती काढण्यात आल्या. राजापूरला प्रथमच अनुसूचित जातीतील सदस्यत्व मिळणार आहे.
प्रांताधिकार्यांना त्या-त्या नगर परिषदांच्या मुख्याधिकार्यांनी सहकार्य केले. यानुसार रत्नागिरी न.प.चा प्रभाग क्र.9 अ, खेड न.प. प्रभाग क्र.4 अ, चिपळूण न.प. प्रभाग क्र.8 अ आणि राजापूर न.प. प्रभाग क्र.5 अ अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहेत.
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र.9 अ जागा अनुसूचित जातीतील सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. या प्रभागात अनुसूचित जातीतील स्त्री किंवा पुरुष उमेदवार निवडणूक लढवू शकणार आहे. प्रभाग क्र.9 ची ब जागा सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे या जागेसाठी कोणत्याही प्रवर्गातील केवळ महिला उमेदवार होऊ शकणार आहे. खेड शहरातील प्रभाग क्र.4 अ ची जागा अनुसूचित जातीतील महिलांसाठी आरक्षित झाली आहे. याच प्रभाग क्र. ब ची जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे.
चिपळूण नगर परिषदेचा प्रभाग क्र.8 अ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. याच प्रभागातील ब जागा ही सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे. राजापूर नगर परिषद प्रभाग क्र. 5 अ ही जागा अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव झाली आहे. तर ब जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे.
राजापूरला प्रथमच अनुसूचित जातीतील सदस्यत्व मिळणार आहे. आरक्षण सोडतीसाठी रत्नागिरीत पिठासीन अधिकारी विकास सूर्यवंशी, खेड पिठासीन अधिकारी राजश्री मोरे, चिपळूण पिठासीन अधिकारी प्रवीण पवार आणि राजापुरातील पिठासीन अधिकारी प्रमोद कदम यांच्या अध्यक्षपदी झालेल्या बैठकीत या सोडती काढण्यात आल्या.