रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

अरबी समुद्रात गुजरातपासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर द्रोणीय स्थिती मान्सूनच्या सक्रिय होण्यातील अडथळे दूर करणारी ठरणार आहे. पश्चिमेकडून वाहणार्‍या वार्‍याचा वेगही वाढविण्यास मदत करणारी ठरणार असल्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या पाच दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणामध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार अरबी सागरात निर्माण झालेले अडथळे दूर झाल्यास मोसमी पाऊस येत्या दोन दिवसात सक्रिय होऊ शकतो. मान्सूनसाठी चांगले पोषक वातावरण तयार झाल्याने मान्सून कोकणातील बहुतांश जिल्हे व्यापणार आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाच्या सरी झाल्यानंतर पावसाने अनेक भागात उघडीप दिल्याचे चित्र पहायला मिळत आहेत. सध्या मात्र मान्सूनचा प्रवास हा संथ गतीने सुरू आहे.

दरम्यान, पुन्हा एकदा मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. येत्या 48 तासात मान्सून कोकणात आगेकूच करील, असे ‘आयएमडी’ने हवामान संदेशात स्पष्ट केले आहे. त्यानुसार पश्चिम किनार्‍यावरील कमी दाबाच्या पट्ट्याने आणि पश्चिमेकडील वार्‍यांच्या प्रभावामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्याच्या प्रभावाने येत्या पाच दिवसात कोकणासह मुंबईतही अनेक भागात पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सक्रिय होण्याची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तविली आहे.

या शिवाय शेजारील गोवा राज्यही यामध्ये व्याप्त राहणार असल्यामुळे हा आठवडा पावसाचा राहणार आहे. दरम्यान, दमदार पूर्वमोसमी पाऊस झाल्यानंतर अनेक भागात पावसाने उघडीप दिली. बुधवारी जिल्ह्यात 0.78 मि. मी. च्या सरासरीने केवळ 7 मि. मी. एकूण पावसाची नोंद झाली. बुधवारी संपलेल्या 24 तासात पाच तालुक्यात पावसाची नोंंद झाली नाही तर उर्वरित तालुक्यात केवळ अपवादात्मक सरी झाल्या. यामुळे अजूनही शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here