
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मान्सून पावसाने हजेरी लावली असली तरी तितकासा जोर धरला नसल्याने पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढच होत निघाली आहे. सध्या 90 गावांतील 188 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तब्बल 40 हजार ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
मान्सून पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात हजेरी लावली आहे. मात्र, अजूनही तो स्थिर झालेला नाही. गेले तीन दिवस पावसाने दडी मारली आहे. सध्या दिवसा कडकडीत ऊन पडत आहे. यंदाचा उन्हाळा कडकडीत गेला होता. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात टंचाईची झळ अधिक बसलेली आहे.
आतापर्यंत सुमारे तेराशेहून अधिक टँकरच्या फेर्यांद्वारे लाखो लिटर पाणी 188 वाड्यांतील लोकांना पुरवले गेले. उन्हामुळे बाष्पीभवन अधिक झाल्यामुळे विहिरींची पाणीपातळी खालावली, नद्या-नाल्यांची पात्रे कोरडी पडली. परिणामी मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याची चणचण जाणवू लागली. गतवर्षी 67 गावांतील 113 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. यंदा त्यात वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पाऊस झाला असला तरीही अजून नद्या, नाल्यांना पुरेसे पाणी आलेले नाही. त्यामुळे अजूनही अनेक भागांमध्ये टँकरने पाणी द्यावे लागत आहे.