खेड : पुढारी वृत्तसेवा; गेल्या काही दिवसांपासून कोकणात संभ्रम निर्माण करणारा मान्सून गतआठवड्यात विजांच्या कडकडाटात दाखल झाला. मात्र, गेले चार दिवसात त्यामध्ये हवी तशी प्रगती होत नसल्याने मान्सूनची वाटचाल रेंगाळली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उन्हाच्या दाहपासून रोप वाचवण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे.

खेड तालुक्यात यावर्षी मार्च महिन्यापासूनच वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाला होता. मे महिन्यात तर आतापर्यंतच्या तापमानाचे रेकॉर्ड मोडीत निघाले होते. वातावरण इतके तप्त झाले होते की, सकाळी दहा वाजल्यानंतर घरातून बाहेर पडणेही अशक्य झाले होते. ग्राहकांची दिवसभर प्रचंड गर्दी असणार्‍या बाजारपेठेसह इतर रस्त्यांवर अकरा वाजताच शुकशुकाट पाहावयास मिळत होता. उकाड्याने हैराण झालेले नागरिक कधी एकदा पाऊस येतो याकडे नजर लावून बसले होते.

दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी जोरदार लावणार्‍या मान्सूनने यावर्षी अद्यापही जोर पकडलेला नाही. गतवर्षी जून महिन्यात 14 तारीखपर्यंत 343 मिमी पाऊस पडला होता. मात्र, यावर्षी केवळ 66 मिमी एवढा पाऊस झाला आहे. गतवर्षी 14 जूनपर्यंत झालेल्या पावसाच्या तुलनेत यावर्षी जेमतेम 20 टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी जून महिन्यात 14 तारीखपर्यंत 343 मिमी पावसाची नोंद झाली होती. यावर्षी केवळ 66 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी 10 जून रोजी 26 मिमी, 11 जून रोजी 10 मिमी, 12 जून रोजी 5 मिमी तर 13 जून रोजी केवळ 10 मिमी पाऊस पडला आहे. गतवर्षी 10 जून पर्यंत 184 मिमी, 11 जूनपर्यंत 222 मिमी, 12 जूनपर्यंत 290 मिमी तर 13 जूनपर्यंत 343 मिमी पाऊस पडला होता.

लांबलेल्या पावसाचे 10 जून रोजी आगमन झाल्याने गेले काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या नागिरकांना दिलासा मिळाला तर शेतकर्‍यांच्या मशागतीची कामे सुरू केली आहेत. गेले चार दिवस पडत असलेल्या कडकडीत उन्हामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे रुजलेली रोपे करपण्याची भीती आहे. तालुक्यातील जगबुडी नदीची पातळी स्थिर असून, 3.30 मी असल्याची माहिती मिळाली आहे. या नदी ची धोका पातळी 7 मीटर तर इशारा पातळी 5 मीटर आहे. मात्र, पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास शेतीची लावणी व अन्य कामे पुढे ढकलण्याची वेळ शेतकर्‍यावर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here