कणकवली : पुढारी वृत्तसेवा ; सध्या सिंधुदुर्गात पडत असलेला पाऊस म्हणजे एका गावात पडला तर दुसर्‍या गावात नाही. खालच्या वाडीत पडला तर वरच्या वाडीत नाही, अशी स्थिती आहे. सध्या पडणारा पाऊस हा श्रावणातील ऊन -पावसाच्या खेळातील आहे. त्यामुळे मान्सून दाखल झाला तरी त्याला पुरेसा जोर नसल्याने शेतकरी चिंतेत आला आहे.

सिंधुदुर्गात सुरू असलेला पाऊस म्हणजे वागदे गावात पडला तर ओसरगावात नाही आणि कसालमध्ये झाला तर ओरोसमध्ये नाही अशी स्थिती आहे. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सिंधुदुर्गात धो-धो पाऊस सुरू होतो. मात्र यावर्षी अर्धा जून संपला तरी मान्सून काहीसा रूसल्यासारखा आहे. महाराष्ट्राच्या इतर भागात पाऊस कमी अधिक प्रमाणात पडत असला तरी सिंधुदुर्गात मात्र तो दरवर्षीच्या रूपात अद्याप कोसळलेला नाही. त्यामुळे नदीनाल्यांना सोडाच विहिरीतील झरेही प्रवाहित झालेले नाहीत. अनेक भागातील विहिरींनी आजही तळ गाठलेला आहे.

मे महिन्याच्या अखेरीला मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर काही शेतकर्‍यांनी तर काहींनी जूनच्या पहिल्या आठवड्यात भात पेरणी केली, मात्र त्यानंतर पावसाचा खेळ सुरू झाल्याने शेत नांगरणीची पुढील कामे सुरू झालेली नाहीत. पेरलेल्या भाताला कोंब येत रोपांची वाढ होण्यासाठी पावसाची आवश्यकता असते. मात्र अपेक्षीत पाऊस होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

सध्या पावसाचा जोर कमी असल्याने पुढील कालावधीमध्ये मुसळधार पाऊस झाल्यास तो शेतीसाठी परवडणारा नाही. त्यामुळे एकूणच यावर्षीची शेती पावसाच्या लहरीपणावर अवलंबून राहणार असल्याने शेतकरी काळजीत सापडला आहे. यावर्षी श्रावणी पावसानेच खरीप हंगामाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे कदाचित श्रावणात मान्सूनसारखा पाऊस कोसळणार तर नाही ना? अशी भीती शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here