
ओरोस : पुढारी वृत्तसेवा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मोठेपणासाठी जिल्हा रुग्णालयाच्या सेवा सरकार मोडीत काढत आहे. एनएचएममधील 51 कर्मचारी व अधिकारी कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे जिल्हा रुग्णालयाची आरोग्यसेवाही कोलमडली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच आता जिल्हा रुग्णालयातील सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यामध्ये 51 कर्मचार्यांच्या नोकर्या गेल्या. या सर्व गोंधळात जिल्ह्यातील गरीब जनतेला रुग्णसेवा मिळत नाही. जर एखाद्या रुग्णाचा हकनाक बळी गेला, तर भाजप आंदोलन उभे करेल, असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव माजी खा. नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
नीलेश राणे यांनी गुरुवारी सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. मोरे यांची जिल्हा रुग्णालयात भेट घेत या गोंधळाबाबतचा जाब विचारला. कंत्राटी कर्मचार्यांच्या नोकर्या थांबवल्या तर त्याच दिवसापासून भाजपचे आंदोलन सुरू होईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पूर्ततेसाठी जिल्हा रुग्णालयाची सेवा कोलमडली आणि जिल्ह्यातील गोरगरिब जनतेला जिल्हा रुग्णालयाची सेवा मिळाली नाही व गोरगरीब रुग्णांचा यात जीव गेला तर प्रथम जिल्हा शल्यचिकित्सक व डीनना जबाबदार धरू,अशा इशारा राणे यांनी देत कंत्राटी कर्मचार्यांना कामावरुन कमी करण्याच्या निर्णयात बदल करा व जिल्हा रुग्णालयाची रुग्णसेवा सुरळीत सुरू ठेवा, असे सांगितले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, जिल्हा बँक संचालक बाबा परब, आनंद शिरवलकर,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे श्रीपाद तवटे चंदन कांबळी पांडू मालवणकर, देवेंद्र सामंत, अवधूत सामंत, सौ. सुप्रिया वालावलकर, सौ. स्नेहा सावंत आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. राणे म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आमचा कोणताही विरोध नाही; पण त्यासाठी असलेली आरोग्यसेवा मोडीत काढून जनतेच्या जीवाशी खेळून यात कर्मचार्यांचा बळी देणे हा सरकारचा प्रयत्न चुकीचा आहेे.