
सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा ; सावंतवाडी- उभाबाजार येथील बाळकृष्ण टंगसाळी यांचे बंद घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न बुधवारी रात्री झाला. मात्र, घरात मौल्यवान वस्तू नसल्याने चोरट्याचां प्रयत्न फसला.ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी भेट देत पाहणी केली.
टंगसाळी कुटुंबीय कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहे. यामुळे त्यांचे घर बंद असते. घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप नसल्याचे गुरुवारी सकाळी परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. कदाचित श्री. टंगसाळी मुंबईतून घरी आले असतील असा समजल करत शेजारच्यांना श्री. टंगासाळी यांच्या नावाने हाक दिली. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने शेजार्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन पहाणी केली असता घराचे कुलूप शेजारील गटारात आढळून आले.
यामुळे टंगसाळी यांच्या घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. याबाबत पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली व बाळकृष्ण टंगसाळी यांना संपर्क केला असता घरात कपडे व अंथरूण वगळता इतर मौल्यवान वस्तू नसल्याचे त्यांनी सांगितले. चोरट्याने कुलूप तोडून आतील कपाटातील कपडे विस्कटून टाकले होते. भरवस्तीत व वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिस प्रशासनाकडून शहरातील चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, उभा बाजार चौकातील कॅमेरा मात्र दुरुस्ती अभावी बंद आहे. याबाबत तेथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. यापूर्वी सन 2012 मध्ये श्री. टंगसाळी यांच्या याच घरात अज्ञाताकडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. उभाबाजार परिसरात होणार्या चोरीला आळा घालण्यासाठी पोलिस गस्त वाढवावी व योग्य ती कार्यवाही व्हावी, असे विनंतीपत्र टंगसाळी यांनी पोलिसांना दिले आहे.