सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा

मालवण तालुक्यातील चिंदर-सडेवाडी येथील श्रीमती ज्योती शशिकांत गोलतकर यांचा मृतदेह 13 जून रोजी मळगाव येथे कोकण रेल्वे मार्गावर आढळून आला होता. त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा अपघात झाला याबाबत संभ्रमावस्था होती. मात्र, पती निधनानंतर ती मानसिकदृष्ट्या विचलित झाली होती, कदाचित या नैराश्यातून आपल्या आईने आत्महत्या केली असवी, अशी शक्यता तिच्या दोन्ही मुलांनी व्यक्त केली. याबाबत आपली कोणतीही तक्रार नसल्याचे त्यांनी पोलिस चौकशीत सांगितले. तिच्या मुलांनी आईची ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेतला, अशी माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली.

मळगाव रेल्वे स्टेशन लगत रेल्वे ट्रॅकवर एका वयस्कर महिलेचा मृतदेह सापडून आला होता. घटनास्थळी सापडलेल्या चषम्याच्या बॉक्सवरुन सदर मृतदेह हा चिंदर-सडेवाडी येथील श्रीमती ज्योती शशिकांत गोलतकर (74) हिचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान शुक्रवारी तिचे दोन्ही मुलगे मुंबईतून सावंतवाडीत दाखल झाले. त्यांच्याकडे तिचा मृतदेह स्वाधीन करण्यात आला आहे. याबाबत मुलांचा जबाब घेतला असता त्यांनी सांगितले, आठ महिन्यांपूर्वी आपल्या वडीलांचे निधन झाले. त्यामुळे आईला मानसिक नैराश्य आले होते. आईची मनस्थिती चांगली नव्हती. 12 जून रोजी ती घरात कोणालाही न सांगता बाहेर पडली.याबाबत आम्ही मुंबई पोलिसात आई बेपत्ता झाल्याची खबर दिली आहे, असा जवाब मुलांनी दिल्याचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी सांगितलेे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here