कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : भाजपा पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याने भाजपाचे पदाधिकारी सुभाष गोपाळ मडव आणि आवळेगाव येथील भाजपा बूथ कमिटी अध्यक्ष महादेव यशवंत सावंत यांचे 6 वषार्ंसाठी भाजपातून निलंबन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपाचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी दिली.

जांभवडे येथील भाजपा पदाधिकारी सुभाष मडव यांनी जिल्हा बँक निवडणुकीत भाजपा पुरस्कृत अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. तसेच जांभवडे विकास संस्थेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवारांच्या विरोधात पॅनेल उभे केले होते. त्याचप्रमाणे वेळोवेळी सूचना देऊनही पक्ष शिस्तीचे पालन न केल्याने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, मडव यांनी या नोटिसला उत्तर न दिल्याने त्यांच्यावर सहा वर्षाकरिता पक्ष निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आवळेगाव-टेम्बगाव येथील भाजपा बूथ कमिटी अध्यक्ष महादेव सावंत यांनी पक्ष शिस्तीचे पालन न केल्याने, त्याचप्रमाणे सभा शिष्टाचार न पाळल्याने आणि वरिष्ठांशी असभ्य भाषेत वक्तव्य केल्याने त्यांना जिल्हाध्यक्ष तेली यांच्या सूचनेनुसार तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला त्यांनी उत्तर न दिल्याने त्यांच्यावरही सहा वर्षांसाठी पक्ष निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती श्री.साईल यांनी दिली.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here