
कणकवली : पुढारी वृत्तसेवा; पावसाळा सुरू झाला की सिंधुदुर्गात रोजंदारीसाठी आलेल्या कामगारांना आपल्या मूळ गावी जाण्याचे वेध लागतात. दिवाळी झाली की हे कामगार गटागटाने सिंधुदुर्गच्या वेगवेगळ्या भागात दाखल झालेले असतात. रस्ता, पूल, साकव, विहिरी, इमारत बांधणी अशा वेगवेगळ्या कामांवर मुकादमाच्या हाताखाली या कामगार टोळ्या काम करत असतात. मात्र, आता कोकणात मान्सून दाखल झाल्याने हे कामगार आपल्या कर्नाटक राज्याच्या विजापूर जिल्ह्यातील आपल्या गावी परतू लागले आहेत. ट्रॅक्टर, टेम्पो अथवा एसटीमधून या कामगारांचा आपल्या मूळ गावी प्रवास सुरू झाला आहे.
मुंबईला राहणारा चाकरमानी असो अथवा सिंधुदुर्गात रोजंदारीसाठी आलेला कामगार, त्याला मूळ गावी जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. नोकरीधंद्यानिमित्त कोकणातील अनेक चाकरमानी कुटुंबे मुंबई, ठाणे, पुणे आदी भागात स्थायिक आहेत. मात्र, गणेशोत्सव, होळी, उन्हाळी सुट्टी अथवा गावची जत्रा आली की त्यांना गावी येण्याची ओढ लागलेली असते. केव्हा एकदा गावी जातो असे त्यांना झालेले असते. तसाच काहीसा प्रवास सिंधुदुर्गात रोजंदारीसाठी आलेल्या विजापूर परिसरातील कामगार कुटुंबांचा सुरू झाला आहे. यावर्षी मान्सून उशिराने दाखल झाल्याने अगदी जूनच्या पंधरवड्यापर्यंत वेगवेगळी कामे हे कामगार करत होते.
यातील अनेक कामगार कुटुंबांनी माळरानावरच झोपड्या बांधलेल्या असल्याने पावसाळ्यात त्यात राहणे कठीण बनते. त्यामुळे पावसाचा जोर काहीसा वाढू लागल्याने आता ही कामगार कुटुंबे घराच्या दिशेने परतू लागली आहेत. यातील अनेक कुटुंंबांची गावाकडे शेती आहे. त्यामुळे गावी पोहोचून शेतीतील कामे आटोपण्याची ओढ या कामगारांना आहे.
सिंधुदुर्गात रस्ते, पूल यासह वेगवेगळ्या प्रकारची बांधकामे या कामगारावरच अवलंबून असल्याने आता विकासकामेही पावसाबरोबरच कामगार नसल्यानेही थांबणार आहेत. पुढील हंगामात हे कामगार सिंधुदुर्गात दाखल झाल्यानंतर विकासकामांना पुन्हा सुरूवात होणार आहे. यातील अनेक कामगार टोळ्यांकडे मुकादमांचे ट्रॅक्टर, डंपर असल्याने त्याच वाहनातून गावी परतण्याचा प्रयत्न हे कामगार करत आहेत. काही कामगार टेम्पो भाड्याने घेत अथवा एस.टी. बसने गावी निघाले आहेत.