
मालवण : पुढारी वृत्तसेवा ; मालवण शहरातील वाणिज्य संकूलनामधील सांडपाणी, कचरा आदी समस्यांसह शहरातील शौचालयांमधील मैला पालिका कर्मचार्यांकडून कोळंब खाडीत टाकण्यात येत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी केला. याप्रश्नी त्यांनी पालिकेत धडक देत आरोग्य निरीक्षकांना धारेवर धरत जाब विचारला. मुख्याधिकार्यांनी याचा खुलासा करावा अन्यथा आंदोलन छेडले जाईल. तसेच याप्रकरणी जिल्हाधिकार्यांचे लक्ष वेधू असा इशारा काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी दिला.
शहरातील कॉम्प्लेक्स, अन्य शौचालयांमधील मैला पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांकडून कोळंब येथील खाडीत सोडण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार काँग्रेसच्या पदाधिकार्यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे संतप्त काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी याचा जाब विचारण्यासाठी पालिकेत धडक दिली. माजी तालुकाध्यक्ष महेश अंधारी, श्रीकृष्ण तळवडेकर, जेम्स फर्नांडिस, संदेश कोयंडे, पल्लवी तारी, बाबा मेंडीस, लक्ष्मीकांत परुळेकर, गणेश पाडगावकर आदी उपस्थित होते.
पालिकेत मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने आरोग्य निरीक्षक प्रसाद भुते यांना याचा जाब विचारला. यावेळी मैला कोळंबच्या खाडीत टाकण्यात येत असल्याची कबुली त्यांनी दिली. यावर काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी या प्रकारामुळे आरोग्य विषयक समस्या उद्वल्यास जबाबदार कोण?असा प्रश्न उपस्थित केला. शहरातील काही कॉम्प्लेक्स मधील सांडपाणी हे उघड्यावर सोडले जात आहे. यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्यास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे कॉम्प्लेक्सची पाहणी देखील अधिकार्यांनी करावी.
शहरातील स्वच्छता व आरोग्य विषयक प्रश्न सोडविण्यास मुख्याधिकारी सक्षम नाहीत. स्वच्छ मालवण सुंदर मालवण असे फलक केवळ नावापुरते लावले आहेत. प्रत्यक्षात तशी कोणतीही कार्यवाही पालिका प्रशासनाकडून होत नाही, असे आरोप काँग्रेस पदाधिकारी महेश अंधारी, संदेश कोयंडे यांनी केले.