
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. एकूण 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (99.27 टक्के) तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा (95.90 टक्के) आहे. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 99.42 टक्के तर द्वितीय स्थानी असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 99.20 टक्के लागला आहे. स्थापनेपासून राज्यात सलग प्रथम येण्याची परंपरा मंडाळाने यावर्षी देखील कायम राखली आहे.
कोकण विभागाने स्थापनेपासून सलग दहाव्या वर्षी राज्यात पहिला येण्याचा बहुमान पटकावला आहे. यंदाही मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. यंदा कोरोना महामारी काळानंतर पहिल्यांदाच झालेली ही दहावीची परीक्षा आहे. मागील वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या निकालाबाबत उत्सुकता होती. विद्यार्थ्यांना त्यांचा ऑनलाइन निकाल दुपारी
1 वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता आला. राज्यातील 12,120 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
कोकण विभागातून एकूण 30 हजार 883 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 30 हजार 816 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 30 हजार 593 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी 99.27 टक्के एवढी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून 20 हजार 762 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 20 हजार 705 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 20 हजार 540 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी 99.20 टक्के एवढी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 10 हजार 121 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 10 हजार 111 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 10 हजार 53 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी 99.42 टक्के एवढी आहे.
कोकण विभागातून 720 पूनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 595 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रत्नागिरीत 10 हजार 540 मुलांपैकी 10425 मुले, 10 हजार 165 मुलींपैकी 10 हजार 115 मुली उत्तीर्ण झाल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 हजार 223 मुलांपैकी 5 हजार 189 मुले तर 4 हजार 888 मुलींपैकी 4 हजार 864 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 0.45 टक्क्यांनी जास्त आहे.
विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत किंवा शाळांमार्फत अर्ज करायचा आहे. गुणपडताळणीसाठी सोमवार दि. 20 जून ते बुधवार 29 जूनपर्यंत अर्ज करायचा आहे. छायाप्रतीसाठी सोमवार दि. 20 जून ते शनिवार दि. 9 जुलै पर्यंत अर्ज करायचा आहे. शुल्कही ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे.
एका विद्यार्थ्याची संपादणूक रद्द
यंदाच्या दहावी परीक्षेवेळी एका विद्यार्थ्याने गैरमार्गाचा अवलंब केल्याने शिक्षासूची प्रमाणे त्याची या परीक्षेचे संपादणूक रद्द करण्यात आली. उत्तरपत्रिका तपासताना त्याच्या उत्तरपत्रिकेत दोन प्रकारची अक्षरे आढळून आली. या बाबत त्याला मंडळाच्या कार्यालयात पाचारण करून त्याचे अक्षर तपासले असता ते त्याचे नसल्याचे निश्चित झाले. त्यामुळे या विद्यार्थ्याने गैरमार्गाचा अवलंब केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याची यंदाच्या परीक्षेची संपादणूक रद्द करण्यात आली आहे.