सावंतवाडी : आंबोली फौजदार वाडी येथील माजी सैनिक सुभाष काशीराम परब (46) हे शुक्रवारी दुपारी 3.30 वा. च्या सुमारास घराजवळील नदीमध्ये मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

सुभाष हे निवृत्त सैनिक होते. नेहमीप्रमाणे दुपारी ते मासे पकडण्यासाठी घराजवळील नदीपात्रातील आज कोंडी येथे गेले होते. त्यांनी जाळे लावण्यासाठी नदीत प्रवेश केला, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. बराच वेळ झाला तरी सुभाष घरी न परतल्याने घरातील मंडळी नदीकिनारी गेली असता नदीकाठावर त्याचे चप्पल व जाळ दिसून आले. याबाबत घरातील लोकांनी वाडीतील ग्रामस्थांना ही गोष्ट सांगितल्यानंतर सर्वजण त्या ठिकाणी पोहोचले. याबाबत आंबोली पोलिसांना खबर देण्यात आली. आंबोलीतील आपत्कालीन व्यवस्थापनचे कार्यकर्ते मायकल डिसूजा , अजित नार्वेकर, राकेश अमृतकर, उत्तम नार्वेकर, प्रथमेश गावडे, राजू राऊळ व इतर गावकरी मिळून नदीमध्ये शोधाशोध केली असता सुभाष यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह नदी बाहेर काढून आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नेण्यात आला. शनिवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन होणार असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. सुभाष यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. या घटनेबाबत अधिक तपास आंबोली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अमित गोते, पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई करत आहेत.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here