चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष महमंदभाई फकीर

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा
अनेकवेळा ‘नॉन मॅट्रिक’ म्हणून हिणवले जात होते. नगरसेवक झालो तरी शासनाच्या नियमानुसार शिक्का मिळत नव्हता. लोकांची कामे होत नव्हती. अनेक लोकांना माघारी पाठवावे लागत होते. ही सल मनाला होती, म्हणूनच आपण या वर्षी दहावीची परीक्षा दिली आणि नॉन मॅट्रिकचा शिक्का पुसला, असे उद्गार नुकतेच दहावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले येथील माजी उपनगराध्यक्ष महंमद फकीर यांनी काढले. ते नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या दहावी परीक्षेमध्ये 68 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांचे शहरातून अभिनंदन होत आहे.

येथील माजी नगरसेवक व उपनगराध्यक्ष महंमद करीम फकीर यांनी शिक्षणाची गोडी नसल्याने नववी इयत्तेतूनच शाळा सोडली होती. त्यावेळी त्यांना शिक्षणाची आवड नव्हती. म्हणून अर्धवट शिक्षण सोडले. मात्र, काही वर्षांनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रवादीतून त्यांनी नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष म्हणून चिपळूण शहरात काम केले. या कालावधीत त्यांना ‘नॉन मॅट्रीक’ असल्याची सल जाणवली. अनेकवळा दहावी नापास म्हणून हिणविले जात होते. इतकेच काय न.प.मध्ये कारभार करीत असताना नॉन मॅट्रिकमुळे अडचणी येत होत्या. त्यामुळे आपण दहावीची परीक्षा द्यायची हे त्यांनी तेव्हाच ठरविले होते. त्यावेळीही ते पोटनिवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांची पत्नीही नगरसेवक झाली होती. नगरसेवक होऊनही आपल्याला शिक्के मिळत नाहीत याचे त्यांना दु:ख होते.

अखेर त्यांनी गतवर्षी दहावी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला व त्यांनी अर्जही दाखल केला. मात्र, लोकं काय म्हणतील या भीतीने ते परीक्षेला बसलेच नाहीत. मात्र, या शैक्षणिक वर्षात त्यांनी नॉन मॅट्रीकचा शिक्का पुसण्याचा निर्धार केला आणि येथील महाराष्ट्र उर्दु हायस्कूलमधून 17 नंबर फॉर्म भरून दहावी परीक्षेसाठी प्रवीष्ठ झाले. त्यांचे भाचे जावेद मुल्ला हे गोवळकोट रोड येथे शिकवणी घेतात. त्यांच्याकडे महंमद फकीर हे जावू लागले व भाच्याने त्यांना दहावी परीक्षेचे धडे दिले. अखेर फकीर हे मार्चमध्ये झालेल्या दहावी परीक्षेसाठी बसले. या परीक्षेत त्यांना उर्दुमध्ये 58, मराठीमध्ये 55, इंग्रजीमध्ये 70, बीजगणित 69, विज्ञान 72, समाजशास्त्रामध्ये 75 असे 500 पैकी 344 गुण मिळाले. महंमदभाई पास झाल्याची बातमी शहरात पसरल्यानंतर सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे त्यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित असून परदेशात आहेत. वयाच्या 55 व्या वर्षी दहावी परीक्षा उत्तीर्ण होण्याची किमया त्यांनी केली आहे.

The post रत्नागिरी : त्यांनी पुसला ‘नॉन मॅट्रिक’चा शिक्का appeared first on पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here