
मालवण/नांदगाव : पुढारी वृत्तसेवा
मालवण शहरात भरवस्तीत तीन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. शहरातील मत्स्य कार्यालय समोरील नेवगी कुटुंबीय यांचे घर, भूमी अभिलेख ऑफिसजवळील सुरेंद्र पालव यांचे घर व मेढा येथील महेश परब यांच्या बंद घराचे कुलूप फोडून चोरट्यांनी डल्ला मारला. या तीनही घरांतील कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी हीच घरे लक्ष केली. या चोरीत नेवगी यांच्या घरातील दीड लाख रुपये रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण तीन ते चार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. कणकवली तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री नांदगाव तिठा येथील किराणा मालाचे दुकान मागील बाजूने फोडून चोरट्यांनी चोरी करत दुकानातील चिल्लर लंपास केली.
कुत्र्यांच्या भुंकण्याने जाग
मालवणात पालव यांच्या घराशेजारी रात्री कुत्रे भुंकत असल्याचा जोरजोरात आवाज येत असल्याने शेजारील कुटुंबीयांना रात्री 2 वा. जाग आली. त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती पळताना दिसून आल्याचे स्थानिकांनी सांगितले. मालवण पोलिस निरीक्षण विजय यादव व पोलिस पथक शुक्रवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले. ओरोस येथून श्वानपथक, ठसेतज्ज्ञ मागविण्यात आले. चोरट्यांनी नेमकी किती रक्कम दागिने यावर डल्ला मारला याबाबत माहिती मिळू शकली नाही.शहरातील चोरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
श्वान तीनही ठिकाणी पोहचला
चोरी झाली त्या तीनही ठिकणी बंद घराचे कुलूप फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे दिसून येत होते. श्वान पथक आल्यानंतर श्वान नेवगी यांच्या घरातून पाठीमागे गेला. बिल्डिंगमध्ये दोन मजल्यावर घुटमळला.त्यानंतर पालव यांच्या घरी व परब यांच्या घरी जाऊन तो घुटमळला. चोरीच्या ठिकाणाचे ठसे पोलिसांनी घेतले आहेत. सायंकाळी डीवायएसपी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.दरम्यानपालव यांच्या घरी रात्री कुत्रे भुंकले तेव्हा शेजारील काही व्यक्ती बाहेर आले तेव्हा एक अनवाणी व्यक्ती पळून जाताना दिसली. तर पहाटे 4 च्या दरम्यान बस स्थानक दिशेने एक अनवाणी व मास्कधारक व्यक्ती पाठीला सॅक व हातात पिशवी घेऊन जाताना भरड येथील नागरिकांना दिसून आल्याचे बोलले जात आहे. या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.
नांदगावात चोरट्यांचा उच्छाद सुरुच
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे भुरट्या चोरांचा सुळसुळाट सुरुच असून गेले काही महिने चोरट्यानी उच्छाद मांडला आहे. गुरूवारी मध्यरात्री नांदगाव तिठा येथील किराणा मालाचे दुकान मागील बाजूने फोडून चोरट्यांनी चोरी केली. ही चोरी करताना चोराने मोठी शक्कल लढवली .दरवाजाचे कुलूप तोडून व पांढरी मोठी पिशवी डोक्यात परिधान करुन आत प्रवेश केल्याचे सीसीटीव्हीत कैद झोले आहे.चोरट्याने काउंटर मधील चिल्लर लंपास केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. याच किराणा दुकान मधून गेल्या आठवड्यातच चोरी झाली होती. त्यावेळी रोख रक्कम 14000 हजार रुपये लंपास केले होते.परिसरात वारंवार होत असलेल्या चोर्यांमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.