राजापूर : पुढारी वृत्तसेवा
गंगा आली की पाऊस लांबतो, असे गंगा आगमनानंतर सर्रासपणे बोलले जाते. त्याचे प्रत्यंतर येऊ लागले आहे. मे महिन्यात येथील गंगेचे आगमन झाले आणि पावसावर त्याचा परिणाम होणार, अशा नेहमीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आता त्याची प्रचीती येऊ लागली आहे. अर्धा जून संपला तरी पावसाचा रुसवा न संपल्याने गंगा आगमनाने पावसावर परीणाम झाला की काय या शंकांना पुष्ठी मिळू लागली आहे.

मे महिन्यात राजापूरच्या गंगामाईचे आगमन झाले आहे. मूळ गंगेसह सर्व कुंडात चांगल्यापैकी पाणी आहे. गोमुखातून अविरत धार सुरु आहे गंगाक्षेत्रावर अजूनही भाविक स्नानासाठी येत आहेत. पावसाळा देखील सुरु झाला आहे दरवर्षी जुनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरवात होते. मात्र, अर्धा जून संपला तरी समाधानकारक पाऊस पडलेला नाही. जून महिन्याच्या उत्तरार्धात ज्या प्रमाणात पावसाला वेग येतो. पण तसा पाऊस पडत नसल्याचे आजचे चित्र आहे.

उन्हाळ्या प्रमाणेच दररोज कडाक्याचे उन पहावयास मिळतेय तालुक्याच्या पूर्व परिसरात दिवसातून एखाद्या वेळी पावसाची हलकी सर पडते. मात्र बाकी तालुक्यात त्याचे प्रमाण फारच कमी आहे. तुरळक स्वरुपात पाऊस पडतो, असे चित्र आहे. वैज्ञानिकदृष्टया या मागील विविध कारणे असली तरी लांबलेल्या पावसाचा संबंध गंगेशी नेहमीप्रमाणे जोडला जातोच गंगा आली की पाऊस लांबतो, असे स्थानिक जाणकार आणि वयोवृध्द लोकांकडून हमखास ऐकायला मिळते. तसे बर्‍याच वेळा पहायलाही मिळाले आहे. नेमके यावेळीही तसेच काहीसे चित्र या महिन्यातच पहायला मिळत आहे. दर तीन वर्षांनी प्रकट होणार्‍या गंगेच्या आगमन व गमन काळात गेल्या काही वर्षात बदल झाले आहेत. या काळात सलग दुसर्‍या वर्षीही गंगा आल्याचीही घटना घडली आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here