
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहेत. पेट्रोल व डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनाच्या इंजिननुसार विम्याची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुचाकी व चारचाकी विम्यांच्या प्रीमियम दरात वाढ झाली असून, त्याची दि. 1 जूनपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने विविध श्रेणीतील वाहनांसाठी तृतीय पक्ष दायित्व (थर्ड पार्टी) वाहन विम्याच्या हप्ते दरात वाढ केली आहे. दि. 1 जूनपासून ही दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे चारचाकी व दुचाकीच्या विमा खर्चात वाढ होणार आहे. मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या सुधारित दरानुसार 1 हजार सीसीपर्यंत इंजिन क्षमता असलेल्या वाहनांसाठी तृतीय पक्ष वाहन विमा हप्ता सध्याच्या 2,072 रुपयांवरून वाढून 2,094 रुपये निश्चित करण्यात आला आहे. तसेच 1000 सीसी ते 1500 सीसी वाहनांसाठी विमा हप्ता 3,416 रुपये करण्यात आला आहे. तो याआधी 3,219 रुपये होता. 1500 सीसी क्षमतेपेक्षा अधिक वाहनांच्या विमा हप्त्यात किरकोळ वाढ झाली आहे. तो आता 7 हजार 890 रुपयावरून वाढून 7,897 रुपये करण्यात आला आहे.
150 सीसीपेक्षा अधिक मात्र 350 सीसीपर्यंतच्या दुचाकीचा विमा हप्ता 1, 366 रुपये असेल, तर 350 सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या दुचाकींसाठी विमा हप्ता 2,804 रुपये आकारण्यात येईल. केंद्र सरकारने हायब्रीड विद्युत वाहनांसाठी विमा हप्त्यावर 7.5 टक्के सूट जाहीर केली आहे. खासगी वापराच्या 30 किलोवॅट क्षमतेच्या ई वाहनांसाठी 1,780 रुपये विमा हप्ता घेतला जाईल तर 30 किलोवॅट ते 65 किलोवॅट क्षमतेच्या विद्युत वाहनांसाठी 2,904 रुपये हप्ता आकारण्यात येणार आहे. वाहनाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विमा काढणे अनिवार्य आहे. दुचाकी वाहनधारक दुचाकी घेतल्यानंतरच विमा काढतात. त्यानंतर मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असतात. ग्रामीण भागातील बहुतांश वाहन चालकांनी आपल्या दुचाकीला विम्याचे कवच घेतले नसल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, अपघात झाल्यास वाहनाला मोठा खर्च येत असतो, त्यासाठी विम्याची आवश्यकता आहे.
वारंवार इंधनाची दरवाढ होत असल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. त्यातच आता विम्याच्या दरातही वाढ झाल्याने वाहनधारकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.
– संजय जाधव
वाहनधारक
The post रत्नागिरी : वाहनांचा विमा वाढला; खिशाला कात्री appeared first on पुढारी.