कणकवली : पुढारी वृत्तसेवा
गेल्या दोन वर्षांच्या कोरोना संकट काळानंतर यंदा प्रथमच आषाढी एकादशीची पंढरपूर यात्रा लाखो भाविक, वारकर्‍यांच्या उपस्थितीत साजरी होणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाचा जयघोष करत श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार्‍या वारकर्‍यांसाठी एस.टी. महामंडळ सज्ज झाले आहे. या यात्रेसाठी एस.टी. महामंडळातर्फे 4700 विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली आहे.

6 ते 14 जुलैदरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. वाखरी येथील माऊलीच्या रिंगण सोहळ्यासाठी 8 जुलैला 200 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या यात्रेसाठी औरंगाबाद प्रदेशातून 1200, मुंबई-500, नागपूर-100, पुणे-1200, नाशिक-1000 तर अमरावती येथून 700 अशाप्रकारे विशेष गाडयांचे नियोजन करण्यात आले आहे.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे रवाना होणार्‍या पालख्यांचा सोहळा साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. आता कोरोनाचे सावट कमी झाल्याने दोन वर्षानंतर भव्यदिव्य स्वरुपात वारी सोहळा होणार आहे. पंढरपूरची आषाढी यात्रा ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी जिव्हाळयाचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवासी वाहतूकीला अनन्य साधारण महत्व आहे. भाविक प्रवासांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेवून जाण्याची आणि विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरुपणे घरी आणून सोडण्याची जबाबदारी एसटीवर असते. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. या यात्रेसाठी राज्यभरातील विविध विभागातून भाविकांसाठी गाडया सोडण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी पंढरपूर येथे यात्रा कालावधीत चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना अशी चार तात्पुर्ती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्हयांसाठी पांडुरंग बसस्थानकावरून बसेस नियोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त भाविक प्रवाशांनी एस.टी. बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here