रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
बारसू येथे रिफायनरी होणार हे निश्चित आहे. राज्य, केंद्र सरकारने यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. स्थानिकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. कोकणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी रिफायनरी होणे काळाची गरज आहे. हे सर्वांना पटू लागले आहे. तर दुसरीकडे प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी खासगी कंपनीही तयार झाली आहे. या ठिकाणी 70 ते 80 हजार कोटींचा प्रकल्प करण्यास केंद्रीय पेट्रोलियम मंत्री ना. हरदीपसिंग पुरी तयार असून दोन-पाच लोकांच्या विरोधाला न जुमानता रिफायनरी प्रकल्प आणला जाईल, असे स्पष्ट मत भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली 13 जून रोजी दिल्लीत पेट्रोलियम मंत्री ना. हरदीपसिंग पुरी यांची भेट झाली. त्यावेळी माजी आमदार प्रमोद जठारही उपस्थित होते. रिफायनरीच्या समर्थनार्थ ग्रामस्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या बाबत मंत्री हरदीपसिंग
पुरी यांच्याशी चर्चा करण्यात आली. काही चिरीमिरी करणारे लोक सोडल्यास या प्रकल्पाला विरोध नाही. सगळीकडे सकारात्मक वातावरण आहे.

राज्यातील ना. उध्दव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारनेही समर्थनार्थ पत्र दिलेले आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी यांनीही प्रकल्प व्हावा, यासाठी पावले उचलली आहेत. ही बाब ऐकल्यानंतर मंत्री पुरी यांनीही प्रकल्प पुढे नेण्यासाठी तयारी दर्शविली आहे. सौदी अरेबियातील अरामको या कंपनीशी चर्चा करुन पुढील तयारी केली जाणार आहे. यामध्ये 70 ते 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून हा पहिला टप्पा आहे.

भविष्यात त्याचा विस्तार करण्यात येईल. या पूर्वी विरोध मोठ्या प्रमाणात होता, म्हणून ही कंपनी पुढे आलेली नव्हती. मात्र, वातावरण चांगले असून गुंतवणुकीसाठी कंपनीही पुढे येण्यास तयार आहे. त्यामुळेच बारसू, सोलगाव येथे रिफायनरीसाठी केंद्र सरकारने तयारी सुरु केली आहे. या प्रकल्पामुळे रोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. सध्या सुरु असलेल्या सर्व्हेला छोटा-मोठा विरोध आहे. पण कार्यवाही बंद केलेली नाही. विरोधही मावळत असून जे विरोध करताहेत त्यांनीही हा प्रकल्प आणण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे श्री.राणे म्हणाले.

जिल्ह्यात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. रिफायनरी आल्यास स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी कुशल कामगारांसाठी प्रशिक्षण केंद्र कंपनीने उभारावीत यासाठी पाठपुरावा केला जाईल. आतापर्यंत ज्यांनी विरोध केला त्यांनी रोजगार आणला नाही, मग आता त्यांचा विरोध खपवून घेतला जाणार नाही. भाजपा रोजगारासाठी प्रयत्न करत आहे. या प्रकल्पामुळे कोकणचाच नव्हे तर राज्याच्या दरडोई उत्पन्नात मोठी वाढ होईल असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here