कणकवली; पुढारी वृत्तसेवा : पिसेकामते-गावठणवाडी येथील श्री लिंगेश्वर मंदिर व श्री पावणादेवी रवळनाथ मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी शनिवारी रात्री फोडल्या. यामधून सुमारे 5 हजारांची रक्कम चोरून नेली. तर वागदे-सावरवाडी येथील महामार्गलगतच्या चंद्रकांत बाबुराव गोर्ले यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी तोडून दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. दोन्ही चोर्‍यांचा कणकवली पोलिस तपास करीत आहेत.

कणकवली, वैभववाडी तालुक्यात मागील महिन्यामध्ये झालेल्या घरफोड्यांचा तपास सुरू असतानाच पुन्हा एकदा शनिवारी रात्री दानपेट्या फोडल्या. पिसेकामते-गावठणवाडी येथील श्री लिंगेश्वर मंदिरातील दानपेटीचा दरवाजा उचकटून 3,200 रुपये लंपास केले. ही चोरी करताना जखमी चोरट्याचे रक्तही मंदिर

परिसरात पडले होते. या मंदिरालगतच्या श्री पावणादेवी-रवळनाथ मंदिरातील दानपेटी बाहेर नेऊन तिचे कुलूप तोडून 1900 रुपयांची चोरी केली.

दोन्ही मंदिरातील चोरीची खबर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र जाधव (रा.पिसेकामते-बौध्दवाडी) यांनी कणकवली पोलिसात दिली. ट्रस्टचे खजिनदार पंढरी भोगले यांनी रविवारी 7 वा. जाधव यांना फोन करून या चोरीची माहिती दिली. त्यानंतर कणकवलीचे पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर श्वानपथक व ठसेतज्ज्ञांचे पथक आले. हे श्वान मंदिर परिसरात काही वेळ घुटमळल्यानंतर ते वरवडे गावातील मुस्लिमवाडी जवळील शाळेपर्यंत पोहोचले. मात्र, त्यापुढे चोरट्याचा माग लागला नाही. पिसेकामतेत झालेल्या चोरीनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे व कणकवलीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी घटनास्थळी भेट देत तपासकामात मार्गदर्शन केले.

वागदेत मुंबई-गोवा महामार्गालगत सावरवाडी येथील चंद्रकांत गोर्ले यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. खोलीतील कपाटही फोडले मात्र आतील दागिने त्याच्या हाती लागले नाहीत. मात्र, चोरट्याने हॉलमध्ये ठेवलेली चावी घेऊन अंगणाात लावलेली दुचाकी लंपास केली. गोर्ले कुटुंबीय बुधवारी गडहिंग्लज येथील नातेवाईकांकडे गेले होते. यादरम्यान ही घटना घडली. भाडेकरूनी याची माहिती गडहिंग्लज येथे गेलेल्या चंद्रकांत गोर्ले यांना दिली. गोार्ले यांनी आपली दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार रविवारी पोलिसात दिली.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here