लांजा; पुढारी वृत्तसेवा : पतीने केलेले दुसरे लग्न टिकावे आणि उघडकीस येऊ नये या हेतूनेच कोर्ले येथील आर्या चव्हाण या सात वर्षीय बालिकेचा खून करण्यात आला असल्याची फिर्याद आर्याची आई माया चव्हाण हिने लांजा पोलिस ठाण्यात दिल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आर्याचे वडील, आजी आणि सावत्र आईसह आठजणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून अटक करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील कोर्ले सहकारवाडी येथील बालिका आर्या राजेश चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्याचा खून करण्यात आल्याचे या फिर्यादीत तिची आई माया चव्हाण हिने म्हटले आहे. दरम्यान, नागिण मालिका बघून केलेली आत्महत्या हा केवळ बनाव असल्याचे या तक्रारीमुळे पुढे आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आर्याची आजी सुनंदा सुभाष चव्हाण, वडील राजेश सुभाष चव्हाण, सावत्र आई काजल राजेश चव्हाण, चुलत आते अनिता नागेश चांदेकर, आजोबा सुभाष नारायण चव्हाण, काका दिपक सुभाष चव्हाण, सुरज सुभाष चव्हाण सर्व राहणार कोर्ले सहकारवाडी,
ता. लांजा आणि सर्जेराव नारायण मोहिते (नाणार राजापूर) या आठजणांना अटक करण्यात आली आहे.

कोर्ले सहकरवाडी येथे दि. 11 जून रोजी रात्री 9 वा. ही घटना घडली होती. सात वर्षीय बालिका आर्या राजेश चव्हाण हिने राहत्या घरी बंद खोलीमध्ये टीव्हीवरील मालिका बघून गळफास घेत आत्महत्या केल्याच्या प्रकार प्राथमिक स्तरावर उघडकीस आला होता. या घटनेमध्ये साशंकता निर्माण झाली होती. ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त होत होता. जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी स्वतः जातीनिशी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घातले होते. इतक्या लहान वयाच्या मुलीने अशी आत्महत्या करणे अशक्यप्राय असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती.

अखेर मयत बालिकेची आई माया राजेश चव्हाण (34 रा. वडगाव, ता. फलटण जि. सातारा) यांनी शनिवारी रात्री उशिरा याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पती राजेश चव्हाण यांनी केलेले दुसरे लग्न टिकावे या हेतूने हा गुन्हा घडला आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here