रत्नागिरी; दीपक शिंगण : कोकण रेल्वेच्या मार्गाचे 100 टक्के विद्युतीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. रायगडमधील रोहा, कर्नाटकमधील ठोकूर दरम्यानच्या 740 किलोटमीटर लांबीच्या विद्युतीकरण झालेल्या कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचा राष्ट्रार्पण सोहळा दि. 20 जून 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रार्पणानंतर कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमक्त वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यासाठी रत्नागिरी, मडगाव तसेच उडूपी येथे इलेक्ट्रीक टॅ्रक्शनवरील रेल्वे गाड्यांना रिमोटद्वारे हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

दि. 24 मार्च मार्च रोजी या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्याकडून तपासणी करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता दि. 20 जूनपासून ‘कोरे’चा संपूर्ण विद्युतीकृत मार्ग राष्ट्राला समर्पित केला जात आहे.

यासंदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुर येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित राहून झेंडा दाखवत विद्युतीकरण झालेल्या मार्गाचा शुभारंभ करणार आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गावर रत्नागिरी, मडगाव आणि उडूपी या तीन ठिकाणी या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

यापार्श्वभूमीवर रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये दि. 20 जून दुपारी 2.20 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, विद्युतीकरणामुळे आता या मार्गावरील गाड्या डिझेल ऐवजी विजेवर धावणार असल्याने वर्षाकाठी डिझेवर होणार्‍या खर्चात रेल्वेची सुमारे दीडशे कोटी रुपयांची बचत होणार आहे. याचबरोबर सध्या डिझेल ऐवजी गाड्या विजेवर धावणार असल्याने ‘कोरे’चा प्रवास आता धूरमुक्तही होणार आहे.

कोकण रेल्वे होणार इको फ्रेंडली आणि गतिमानही!

कोरोना काळात मोठा आर्थिक फटका सहन करावा लागलेल्या कोकण रेल्वेने विद्युतीकरण आणि मार्ग दुपदरीकरणाच्या कामाचा वेग मंदावू न देता हे काम पूर्ण केले आहे. यासाठी पंतप्रधान मोदी तसेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीदेखील कोकण रेल्वेच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. विद्युतीकरण आणि मार्ग दुपदरीकरण या दोन्ही कामांमुळे आगामी दशक हे कोकण रेल्वेसाठी गतिमान ठणार आहे. प्रदूषणमुक्त आणि इको फ्रेंडली प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here