गुहागर; पुढारी वृत्तसेवा : साडीच्या झोपाळ्यात खेळताना फास लागून एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना पालशेत बाजारपेठ सावरकर पेठ येथे घडली. निहाल सुभाष जाक्कर असे या मुलाचे नाव असून तो आठवीत शिकत होता.

या बाबत जितेंद्र दत्ताराम वायंगणकर (36) यांनी गुहागर पोलिस ठाणे येथे माहिती दिली. त्यानुसार जितेंद्र वायंगणकर हे पालशेत येथे राहतात. घरी त्यांची पत्नी अपेक्षा, मुलगी श्रेया, त्यांचा आतेभाऊ सुभाष जाक्कर, त्यांची पत्नी शकुंतला जाक्कर, त्यांची मुले सृष्टी, निहाल व स्वराज अशी दोन कुटुंब एकत्र रहातात. महिनाभरापूर्वी घरातील मुलांना खेळण्याकरता घराच्या माळ्यावर जितेंद्र वायंगणकर यांनी नायलॉनच्या साडीचा झोपाळा बांधलेला होता. या झोपाळ्यावर स्वराज, श्रेया आणि निहाल हे दररोज खेळायचे. जितेंद्र वायंगणकर यांचे साखरी आगर येथे बेकरीचे दुकान आहे.

शुक्रवार दि. 17 रोजी जितेंद्र वायंगणकर रात्री नऊ वाजता बेकरीतील काम आटपून घरी आल्यावर घराच्या माळ्यावर गेले. तिथे त्यांच्या आतेभावाचा मुलगा निहाल नायलॉन साडीच्या झोपाळ्यात अडकलेला त्यांना दिसला. निहालच्या मानेला साडीचे वेटोळे होते तर निहालचे पाय लोंबकळत होते. तातडीने त्यांनी सुभाषला बोलावले.

दोघांनी नायलॉन साडीच्या झोपाळ्यात अडकलेल्या निहालला सोडविले व खासगी दवाखान्यात घेऊन गेले. या नंतर अधिक उपचारासाठी शृंगारतळी येथील डॉ. राजेंद्र पवार यांच्या दवाखान्यात नेले. मात्र, डॉ. पवार यांनी निहाल मृत असल्याचे घोषीत केले. शुक्रवारी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान निहाल एकटाच माळ्यावर खेळायला गेला होता. याच दरम्यान साडीच्या झोपाळ्यात मान अडकून त्याचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री निहालचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे नेण्यात आला. शोकाकूल वातावरणात पालशेतमध्ये निहालच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास गुहागरचे प्रभारी पोलिस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here