रत्नागिरी;  पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्ह्यातच टायरअभावी तब्बल 90 बसेस विभागीय कार्यशाळेत उभ्या आहे. एका बाजूला एसटीचे विस्कळीत झालेले वेळापत्रक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. शाळा सुरु झाल्याने एसटी बसेसच्या मागणीत वाढ होत असताना आता टायरचे नवे संकट रत्नागिरी विभागासमोर उभे राहिले आहे. नवीन टायर न आल्याने एस. टी. बसेस कार्यशाळेतच उभ्या करून ठेवण्याची वेळी प्रशासनावर आली आहे.

कोरोना प्रादुर्भाव, त्यानंतर कर्मचार्‍यांचा बंद या कालावधीत एसटीच्या बसेस कार्यशाळेत तसेच आगारातून उभ्या होत्या. त्या कालावधीत त्यांची दुरुस्ती करण्यात आली नव्हती तर संप संपल्यानंतर सुरुवातीच्या काळात भारमान नसल्याने काही निवडक मार्गावरील फेर्‍या सुरू झाल्या. त्यानंतर एसटीचे वेळापत्रक सुरळीत करण्याचे काम एसटीचे प्रशासन करत होते.

दि. 15 जूनपासून शाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागासह शहरी भागातही एसटी बसेसच्या मागणीत वाढ झाली आहे. लांब पल्ल्याच्या तब्बल 18 ते 20 बसेस ग्रामीण भागासाठी वळविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात दररोज एसटीच्या 4 हजार 500 फेर्‍या नियमित धावात होत्या. कोरोना कालावधीपासून त्यामध्ये कपात झाली. कर्मचारी बंदच्या कालावधीत एसटी सेवा पूर्णत: ठप्प झाल्याने आता जून वेळापत्रक पुन्हा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात 3 हजार 800 फेर्‍या सुरु आहेत.

शाळा सुरु झाल्यानंतर ग्रामीण व शहरी भागात 350 फेर्याची मागणी अतिरिक्त आली होती.त्यातील बहुतांश भागात गाड्य सुरु करण्यात आल्या आहे. काही गाड्याचे मार्ग बदलून त्या विद्यार्थी वाहतुकीसाठी वळविल्या जात आहेत. जिल्ह्यातील सर्व मार्गांवर विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी एसटी प्रशासना घेत असल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरी भागात सन 2019 ला 43 फेर्‍या सुरु होत्या. आता पुन्हा 40 फेर्‍या पूर्ववत करण्यात एसटीला यश आले आहे. विद्यार्थी संख्येनुरूप काही मार्गावर फेर्‍या वाढविण्याचे काम सुरू असल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here