
दापोली; पुढारी वृत्तसेवा : नागरिकांचे खोके हटवून त्यांचे व्यवसाय बुडवलेत आता त्या जागेवर तुमच्या व्यवसायाचे बॅनर लावा आणि दापोलीची शोभा वाढवा, असा संताप माजी नगरसेवकांनी व्यक्त केला. सत्ताधारी नगरसेवकांनी खोके हटविलेल्या जागेवर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसायाचा बॅनर लावताना हा संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी सत्ताधारी नगरसेवक आणि माजी नगरसेवक यांच्यात रंगलेली शाब्दिक चकमक पाहून पाहणार्यांचे मनोरंजन झाले.
दापोली शहरात बेकायदेशीर खोके हटाव मोहीम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी दापोली नगर पंचायत, महसूल विभाग आणि पोलिस यंत्रणा अशी संयुक्त मोहीम राबवून दापोलीत अनेक ठिकाणचे बेकायदेशीर खोके हटविण्यात आले आहेत. भविष्यात खोकेमुक्त दापोली असा निर्धार शिवसेना-राष्ट्रवादी या सत्ताधार्यांनी केला आहे. या खोके हटाव मोहिमेत राष्ट्रवादी नगरसेवक अग्रेसर आहेत. दि. 16 रोजी दापोली नगर पंचायतीमधील शिवसेना गटनेते हे आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसायाचा बॅनर दापोली तहसील समोरील जागेत रस्त्याच्या बाजूला लावत असताना माजी नगर सेवक प्रकाश साळवी आणि मंगेश राजपूरकर यांनी बॅनर समोर लावू नका, मागे लावा असे सांगितले. मात्र, हा बॅनर इथेच लागेल. आम्ही सत्तेत आहोत, असे नगरसेवक रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले. त्यामुळे या ठिकाणी शाब्दिक चकमक वाढली. काही नागरिकांनी हा बॅनर लावण्याची परवानगी घेतली आहे का? हे पाहण्यासाठी दापोली नगर पंचायतीमध्ये धाव घेतली. मात्र, त्या आधीच हा बॅनर त्या ठिकाणाहून हटविण्यात आला.
याबाबत दापोली नगर पंचायतीकडे हा बॅनर लावण्याबाबत परवानगी घेण्यात आली आहे का? असे बॅनर परवानगी अधिकारी मंगेश जाधव यांना विचारले असता अधिकार्यांकडून सारवासारव करण्यात आली. बॅनर लावण्यासाठी दि.25 मे रोजी मोहीत क्षीरसागर यांच्या नावे अर्ज दापोली नगर पंचायतीच्या दप्तरी आहे. मात्र, याबाबत दापोली नगर पंचायतीने लेखी परवानगी दिलेली नाही.