दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा
मणेरी येथे दुचाकी व कार यांची समोरासमोर धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार भाऊ-बहीण गंभीर जखमी झाले. निखिल लक्ष्मण ठाकूर (24) व अक्षता लक्ष्मण ठाकूर (27, दोघेही रा. सासोली- हेदूस) अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात रविवारी रात्री 9.15 वा.च्या सुमारास घडला.

अक्षता व निखिल हे दुचाकीने दोडामार्गवरून घरी सासोलीला जात होते. दोडामार्ग-बांदा राज्यामार्गावर मणेरी येथे समोरून येणारी स्विफ्ट कार व त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यावेळी निखिल रस्त्याच्या बाजूला पडला तर बहीण अक्षता रस्त्यालगत घळणीत फेकली गेली. निखिल जागीच बेशुद्ध पडला तर घळणीत पडलेली अक्षता जीवाच्या आकांताने ओरडत होती. कारमधील इसमांनी आवाजाच्या दिशेने अक्षताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीची वेळ असल्याने त्यांना शोध घेण्यास अडचण येत होती. दरम्यान, दोडामार्गचे नगरसेवक संतोष नानचे हे सावंतवाडीहून घरी दोडामार्गला परतत असताना त्यांनी ही दुर्घटना पाहून आपली गाडी थांबवली. अक्षता हिला घळणातून बाहेर काढत दोघांनाही रुग्णवाहिकेतून येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात केले. अक्षताच्या डाव्या हाताला व दोन्ही पायांना जबर मार लागला होता. निखिलच्या दोन्ही हातांना व डाव्या पायाला खरचटले, आणि डोक्यालाही जखमा झाल्या होत्या. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना गोवा-बांबुळी येथे पाठविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here