कणकवली : पुढारी वृत्तसेवा
आश्वासने देऊन देखील कणकवली तालुक्यातील साकेडी मधील ट्री कटिंगची कामे मार्गी लागली नसल्याने साकेडीतील ग्रामस्थांनी सोमवारी पुन्हा महावितरणच्या अधिकार्‍यांना घेराव घालत जाब विचारला. अपुर्‍या मनुष्यबळामुळे हे काम रखडले असून दोन दिवसात ठेकेदाराच्या कामगारांमार्फत हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते व अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीश भगत यांनी दिले. दरम्यान ग्रामस्थांना आश्वासन देऊन व संपूर्ण स्थितीचा पाहणी करून देखील ट्री कटिंग व वीज समस्येसंदर्भात काम मार्गी लावले नसल्याने उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश श्री. मोहिते यांनी दिले.

साकेडी गावांमधील ट्री कटिंग व अन्य विविध समस्यांसंदर्भात दहा दिवसांपूर्वी उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांनी सर्वे केला होता. त्या सर्वेनुसार ग्रामीण विभागाचे सहाय्यक अभियंता श्रीराम राणे यांना संबंधित जागांचे फोटो पाठवून तात्काळ उपाय योजनेच्या सुचना दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात कोणतीच कार्यवाही दहा दिवसानंतर ही झाली नसल्याने ग्रामस्थांनी सोमवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. लक्ष वेधून देखील महावितरणच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना काळोखात राहावे लागणार आहे. वादळी वार्‍यांच्या वेळी फाद्यामुळे तारा तुटून वीज पुरवठा खंडित होणार आहे. यामुळे ग्रामस्थांनी यासंदर्भात सोमवारी पुन्हा कार्यकारी अभियंत्यांची भेट घेत संतप्त भावना व्यक्त केल्या.

ग्रामपंचायत मार्फत देखील यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यावेळी सोसायटी संचालक राजु सदवडेकर तसेच ग्रामस्थ अजित शिरसाट, रवींद्र कोरगावकर, ग्रामसेवक संजय तांबे यांच्यासह अन्य उपस्थित होते. आश्वासन दिलात मग काम का मार्गी लागले नाही? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. मात्र, कर्मचारीवर्ग अपुरा असल्याचे कारण देण्यात आले. जर कर्मचारीवर्ग अपुरा असेल तर त्याच वेळी का सांगितलं नाही? ग्रामस्थांनी सर्वे केलेला पाहिला आहे. सर्वे वेळी जे दाखवणारे ग्रामस्थ होते त्यांना ग्रामस्थ आता प्रश्न विचारत आहेत. असा मुद्दा यावेळी उपस्थित केला. त्यावर श्री. मोहिते यांनी श्री. बगडे यांना वारंवार सूचना दिल्या. मात्र, का झाले नाही त्याची माहिती घेतो. व तात्काळ बगडे यांना कारणे दाखवा नोटीस बजवा, अशा सूचना श्री. मोहिते यांनी गिरीश भगत यांना दिल्या. तसेच ग्रामस्थांनी आम्हाला कारणे नको कोणत्याही परिस्थितीत तातडीने काम मार्गी लागले पाहिजे. गावात गणेश चतुर्थी त्या काळात देखील वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो.

गावात दोन गणेश चित्र शाळा असून, गणेश चतुर्थीच्या तोंडावर विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने मूर्तिकारांना ही त्रास सहन करावा लागतो. तसेच अनेकदा नळयोजना बंद राहतात. बोरवेल बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ट्री कटिंगची कामे कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजे अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर श्री मोहिते यांनी मालवण हुन एका ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांची टीम दोन दिवसात साकेडीमध्ये पाठवून युद्धपातळीवर काम मार्गी लावले जाईल असे आश्वासन दिले. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कर्मचार्‍यां मार्फत कामे केली जातील, असे आश्वासन देण्यात आले. ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात गेल्यावर लगेच उपकार्यकारी अभियंता यांना बोलवा अशी मागणी केली. मात्र सुमारे तासभर राहून अधिक काळ झाला तरी महावितरण कार्यालयाच्या पलीकडील बाजूस असलेल्या सबस्टेशन मध्ये असलेले उपकार्यकारी अभियंता विलास बगडे हे ग्रामस्थांना सामोरे आले नाहीत.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here