
कणकवली : पुढारी वृत्तसेवा
कोकणात विपुल निसर्ग संपत्ती आहे. कोरोनाच्या महामारीत जगातील सारे उद्योग बंद पडले असले तरी शेती व्यवसाय मात्र तेजीत होता. शेती हा आपल्या देशाचा कणा आहे. अत्याधुनिक शेतीचे ज्ञान संपादन करून आजच्या नव्या पिढीने शेतीकडे लक्ष दिले पाहिजे. कोकणात काजू, नारळ, आंबा, चिकू, बांबू अशा वेगवेगळ्या उत्पादनाला मोठी संधी आहे, हे विचारात घेऊन नव्या पिढीने या उत्पादनाकडे वळावे असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील कृषी तज्ज्ञ डॉ. विलास सावंत यांनी केले.
कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात सोमवारी संस्थापक चेअरमन तथा माजी आमदार केशवराव राणे यांचा 12 वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. विलास सावंत यांनी ‘कोकणातील फलोत्पादन विकास’ या विषयावर सविस्तर आणि प्रदीर्घ असे व्याख्यान दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन पी. डी. कामत, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाई खोत, विश्वस्त डॉ. राजश्री साळुंखे, सदस्य आप्पासाहेब सापळे, डॉ.सविताताई तायशेटे, डॉ. संदीप साळुंखे, प्रगतशील शेतकरी मुरलीधर राणे, प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम माजी आमदार केशवराव राणे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तसेच ‘वार्षिक’ अंकाचे प्रकाशन त्याचबरोबर महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी कनक वार्षिक अंकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते या प्रसंगी करण्यात आले. महाविद्यालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष नुकतेच पूर्ण झाले असून त्याचे प्रतिबिंब ‘कनक ’मध्ये उमटले आहे.
यावेळी भाई खोत म्हणाले कै. केशवराव राणे यांनी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे. ते कार्य वृद्धिंगत करण्याचा शिक्षण प्रसारक मंडळाचा प्रयत्न आहे. विश्वस्त डॉ. राजश्री साळुंखे पिताश्री केशवराव राणे यांनी धनसंपत्ती पेक्षा जनसंपत्ती श्रेष्ठ मानली आणि उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिक्षण व सामाजिक क्षेत्रात योगदान दिले. त्यांचा हा वसा अणि वारसा शिक्षण प्रसारक मंडळ पुढे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. डी. कामत यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात कै. केशवराव राणे हे सोळा वर्षे आमदार, दहा वर्षे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. समाज सेवेचे नवे मानदंड त्यांनी घालून दिल्याचे सांगितले. याप्रसंगी डॉ. संदीप साळुंखे, अप्पासाहेब सापळे, प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले.