रत्नागिरी पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीची आरक्षण प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यानंतर खर्‍याखुर्‍या निवडणूक युद्धाला सुरुवात होण्यापूर्वीच शिवसेनेने विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी पक्षप्रवेशासारखे मनोवैज्ञानिक युद्ध सुरू करणारे शस्त्र बाहेर काढले आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुहेल साखरकर यांचा नुकताच शिवसेना प्रवेश झाला हा त्याच रणनितीचा भाग होता. आता पुढे प्रत्येक पक्षातील अशी नेते मंडळी शिवसेनेत घेतली जाणार आहेत.

नगरपरिषदेची निवडणुक गणेशोत्सव संपल्यानंतर लगेचच होण्याची शक्यता मानली जात आहे. नुकतीच आरक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रभागाअंतर्गत इच्छुक उमेदवारांच्या हालचाली वाढू लागल्या आहेत. शिवसेनेला पुन्हा बहुमत मिळेल, अशी आशा असल्याने शिवसेनेकडे येणार्‍यांचा ओढा अधिक आहे. अशा राजकीय घडामोडीत ज्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळणार नाही ते विरोधी पक्षांच्या गळाला लागणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामसूम आहे. मात्र, शिवसेनेच्या नेत्यांनी आत्तापासूनच मनोवैज्ञानिक युद्ध प्रारंभ केले आहे.

शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी मनोवैज्ञानिक युद्ध सुरु करून निवडणूक माहोल बनविण्यास प्रारंभ केला आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुहेल साखरकर यांचा नुकताच शिवसेना प्रवेश झाला. त्यामुळे आता शिवसेनेत येणार्‍यांना घाई झाली आहे. आयत्यावेळी शिवसेनेत जाऊन उमेदवारी मिळवणे म्हणजे स्वतःहून रोष ओढवून घेण्यासारखे असल्याने यापुढे शिवसेनेत प्रवेश करण्याची रांग लागणार आहे.

शिवसेनेच्या प्रतिस्पर्ध्यांकडे मात्र निवडणूक आव्हानाची भूमिका स्वीकारण्याची अजून मानसिकता दिसून येत नाही. अशावेळी शिवसेनेचे नेते किरण उर्फ भैया सामंत आणि ना. उदय सामंत यांनी अचूक जागी वार करण्यास सुरुवात केली आहे. आता एका पक्षातील माजी नगरसेवकाच्या शिवसेना प्रवेशाने भुयार खणले गेले आहे. हे भुयार उघडपणे जाणवत नसले तरी निवडणुकीपूर्वी विरोधीपक्षांमध्ये खिंडार पडणार याची ही चुणूक मानली जात आहे.

रत्नागिरी शहरामध्येही शिवसेनेचेच वर्चस्व आहे. अशावेळी निवडणुका झाल्यानंतर सोडून जाणार्‍यांची अडचण निर्माण होईल याची अप्रत्यक्ष कल्पनाक्षि याच युद्धातून संबंधितांना दिली जात आहे. कॅबिनेट मंत्री उदय सामंत शिवसेनेत आल्यानंतर त्यांचे काही सहकारी त्यांच्यासोबत येऊ शकले नाहीत. काहीजण पुन्हा निघून गेली. अशी सर्व नेतेमंडळी पुन्हा नामदार सामंतांचे हात आणखी बळकट करण्यास येणार आहेत. अशा राजकीय घडामोडीतून शिवसेनेला शह देणे शक्य नसल्याचेही ना. सामंतांकडून विरोधकांना भासवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.

पक्षप्रवेशाचे भुयार उघडे करून विरोधी पक्षांना खिंडार पाडण्याची रणनीती

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here