वेंगुर्ले ; पुढारी वृत्तसेवा : वेंगुर्ले-दाभोलीमार्गे कुडाळ या मुख्य रस्त्यावर दाभोली-हळदणकरवाडी येथे मंगळवारी दुपारी 12.50 वा. गुरांसाठी चारा नेत असलेल्या खानोली-घोगळवाडी येथील रहिवासी बाबुराव गंगाराम मयेकर (63) यांचा डंपरच्या मागील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. बाबुराब मयेकर हे मंगळवारी दुपारी गुरांसाठीचा चारा घरी आणत असताना दाभोली-हळदणकरवाडी येथे मुख्य रस्त्यावर खडी वाहतूक करणार्‍या डंपरची त्यांना धडक बसली.

या धडकेत बाबुराव मयेकर हे डंपरच्या मागील चाकाखाली सापडले. घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ले पोलिस निरीक्षक अतुल जाधव, पो.काँ. अमर कांडर, गजेंद्र भिसे, दत्ताराम पालकर, योगेश वेंगुर्लेकर, नितीन चोडणकर, राहुल बर्गे, वाहतूक पोलिस मनोज परूळेकर, पांडुरंग खडपकर आदींसह पोलिस पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले.

दाभोली सरपंच उदय गोवेकर, उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, पोलिस पाटील जनार्दन पेडणेकर, कोतवाल सुभाष दाभोलकर, ग्रामसेवक संतोष पिंगुळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तापस ठप्प झाली होती. पंचनामा झाल्यानंतर दुपारी मृतदेह वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. शवविच्छेदन प्रक्रिया सायंकाळी 6 वा. पर्यंत पूर्ण न झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. घटनेची फिर्याद गंगाराम बाबुराव मयेकर यांनी वेंगुर्ले पोलिसांत दिली आहे.

बाबुराव मयेकर हे मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, बहीण असा परिवार आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून त्यांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेपासून सुमारे अर्धा ते एक किमी अंतरावर त्यांचे घर होते.त्यांच्या आकस्मिक मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here