
चिपळूण : पुढारी वृत्तसेवा
चिपळूण शहराचा इतिहास लक्षात घेता 1965 पूर्वी चिपळूणमध्ये पूर केव्हाही आलेला नाही. त्यानंतर मात्र सातत्याने पूर येत आहे. 1975 साली कोळकेवाडी धरण बांधल्यानंतर चिपळूणला सातत्याने पुराचा फटका बसत आहे. हे धरण बांधण्याआधी व कोयनेचे अवजल वाशिष्ठीत सोडण्यापूर्वी या नदीची धारण व जलवहन क्षमता तपासली होती का, असा सवाल उपस्थित करून पुराची तीव्रता अवजलामुळे वाढते, असा दावा चिपळूण बचाव समितीने केला आहे.
चिपळूणचा पूर गेले वर्षभर गाजत आहे. गतवर्षीच्या महापुरात कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. अनेकांचा जीवही गेली. या पार्श्वभूमीवर आता शासनाने अभ्यास गटाची नेमणूक केली आहे. या अभ्यासगटाची उद्या (दि.22) बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण बचाव समितीने हे निवेदन केले आहे. याबाबत प्रकाश काणे, शिरीष काटकर, राजेश वाजे, अरुण भोजने, महेंद्र कासेकर यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यानुसार महापुरानंतर अधिकार्यांनी चिपळुणात 27 जुलै 2021 रोजी 11 हजार क्युसेक पाणी सोडल्याचे जाहीर केले. हे अधोरेखीत झाले आहे. 11 हजार क्युसेक पाणी सोडल्यामुळे महापुराची दाहकता वाढली नाही. कारण वाशिष्ठीची क्षमता अडीच लाख क्युसेक आहे, असे त्यांचे म्हणणे पूर्णत: चुकीचे आहे.
पोफळी पायथा ते गोवळकोटपर्यंत नदीची रूंदी कमी झालेली आहे. नदीतील बेटं दुपटीने वाढलेली आहेत. नदीची वाहन क्षमता 70 हजार क्युसेक असू शकते. त्यामुळे कोळकेवाडीतून सोडलेल्या पाण्यामुळे पुराची दाहकता वाढल्याचा दावा बचाव समितीने केला आहे. खेर्डीमध्ये चिपळूणपेक्षा जास्त पाणी होते. गोवळकोटपासून मालदोली व त्या पुढील भागात खाडीलगत पुराचे पाणी शिरले नाही. कारण त्या ठिकाणी नदीचे पात्र रुंद आहे.
गतवर्षी महापुरावेळी धरण व्यवस्थापनाने पूर नियंत्रणाचे कुठलेही उपाय केले नाहीत. त्यावेळी कोयना धरणात 80 टीएमसी पाणी होते. तरीही वीजनिर्मिती करून पाणी वाशिष्ठीमध्ये सोडले. पूर नियंत्रणासाठी कोळकेवाडी धरणाचा देखील वापर झालेला नाही. जनरेशन कोणते बंद केले हे अद्याप समजलेले नाही. चिपळूणमध्ये अन्य कोणत्या ठिकाणाहून पाणी सोडण्याचे पर्याय आहेत याची माहिती दिलेली नाही. महाजनको व पाटबंधारे विभाग यांच्यात समन्वय नाही.
आयआयटी संस्थेकडून चौकशी करावी
कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी 20 ते 25 जुलै 2021 रोजी सारखीच होती. मग पाणी कुठे अडविले हे जाहीर करावे. त्यामुळे या प्रकरणी आयआयटी संस्थेकडून चौकशी करावी, अशी मागणी बचाव समितीने केली आहे.
The post अवजलामुळे वाढतेय पुराची तीव्रता appeared first on पुढारी.