Assam Floods

राजापूर : पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यात राजापूर शहरात भरणार्‍या पुराचा धोका लक्षात घेता तहसील प्रशासनाने पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, पूरग्रस्त असतानाही अद्याप पर्यायी भूखंड मिळाला नसल्याने स्थलांतरित कोठे व्हायचे, असा सवाल भूखंडापासून वंचित असलेल्या पूरग्रस्तांकडून करण्यात आला आहे.

राजापूर शहराला दरवर्षी पुराच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे बाजारपेठेतील रहिवासी व व्यापार्‍यांचे मोठे नुकसान होते. हे लक्षात घेऊन शासनाने पूररेषा निश्‍चित करून नागरिकांचे साईनगर भागात पुनर्वसन केले आहे. पावसाळ्यात पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पूररेषेतील नागरिकांना पर्यायी जागेत स्थलांतरित होण्याच्या नोटीसा पशासनाकडून बजावण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही शहरातील काही पूरग्रस्तांना यादीत नाव असतानाही पुनर्वसन वसाहतीत भूखंड मिळालेला नाही. मग आम्ही पावसाळ्यात धोकादायक स्थितीत कोठे स्थलांतर करायचे, असा सवाल भूखंडापासून वंचित असलेल्या पूरग्रस्तांतून करण्यात येत आहे.

दरम्यान, न. प. शासनाकडून आलेल्या नोटिसीमध्ये आपणास पर्यायी भूखंड देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, सन1990 च्या पूरग्रस्तांच्या यादीत 700 चौरस फुटाचा भूखंड माझे पती कै. सदानंद टिळेकर यांच्या नावाने मंजूर असतानाही तो अद्याप आमच्या ताब्यात मिळालेला नाही. त्यामुळे पावसाळ्यातील पूराच्या धोक्याच्या स्थितीत स्थलांतर करण्यास आम्हाला कोठेही आसरा नाही. त्यामुळे आम्हाला पूररेषेतील घरात राहण्यावाचून अन्य पर्याय नाही. पावसाळ्यात पुरामुळे वित्तहानी अथवा जीवित हानी झाल्यास त्याला सर्वस्वी राजापूर नगर परिषद व तहसीलदार कार्यालयच जबाबदार राहील, असा इशारा देतानाच ती वेळ येऊ नये यासाठी पूरग्रस्त यादीतील मंजूर असलेला भूखंड तत्काळ आम्हाला मिळावा, अशी मागणी जवाहर चौक येथील श्रीमती पुष्पलता सदानंद टिळेकर यांनी केली आहे.

The post राजापुरात पूरग्रस्तांना स्थलांतराच्या नोटिसा appeared first on पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here