चिपळूण : पुढारी वृत्तसेवा
नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे विविध राजकीय पक्षातून सुरू झाले आहेत. गेली पाच वर्षे नगराध्यक्ष पदाच्या जोरावर सत्तेत असलेल्या चिपळुणातील भाजपाने न.प. निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी 14 प्रभागांतून 28 उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी भाजपतील काही चाणक्य नेत्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील आजी-माजी नगरसेवकांना भाजपाकडून उमेदवारी देण्याबाबत संपर्क अभियान सुरू केले आहे.

चिपळूण न.प.वर जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांच्या जोरावर सदस्यसंख्या कमी असतानाही पाच वर्षे सत्ता वर्चस्व ठेवणार्‍या भाजपाला आगामी न.प.च्या सार्वत्रिक निवडणुकीत मात्र सर्वच प्रभागातून सक्षम उमेदवार शोधावे लागत आहेत. त्या दृष्टीने भाजपमधील चाणक्यनितीचा अवलंब करणार्‍या काही नेत्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काही प्रमाणात काँग्रेस पक्षातील आजी-माजी नगरसेवकांजवळ सुसंवाद सुरू केला आहे.

मावळत्या सभागृहात शिवसेनेचे 12 नगरसेवक, त्या खालोखाल काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी अशा संख्याबळात भाजपाची सत्ता असूनही शहरात मात्र पक्षाची ताकद वाढण्यास सत्तेकडून बूस्टर डोस मिळाला नाही. पाच वर्षांत हाताच्या बोटावर मोजण्याइतपत पदाधिकारी व कार्यकर्ते, त्यामध्ये पदाधिकार्‍यांची संख्याच जास्त असल्याचे दिसून येत आहे. अपुरी ताकद व कार्यकर्त्यांची आवश्यक असलेली राजकीय फौज भाजपला अपेक्षित यश मिळण्यास पुरेशी नाही.

पारंपरिकरीत्या शहरात केवळ दोनच प्रभाग भाजपाच्या उमेदवारांना अनुकूल ठरले आहेत. तसेच नव्या प्रभाग रचनेत पारंपरिक भाजपाचे हे दोन प्रभाग भाजपाकडेच राहतील याची खात्री देता येत नाही. नव्या प्रभाग रचनेत भाजपाची पारंपरिक मते विखुरली गेली आहेत. त्याचा फटकाही या दोन प्रभागांतून भाजपाला बसणार आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पाच वर्षे सत्ता भोगणार्‍या भाजपाने सर्वच प्रभागातून उमेदवार लढविण्याची जोरदार तयारी केली आहे. त्यातूनच विविध राजकीय पक्षातील आजी-माजी नगरसेवकांसह सक्रिय पदाधिकार्‍यांशी संपर्क करून सुसंवाद साधण्यास सुरुवात केली आहे.

 उमेदवारांची जुळवाजुळव सुरू

भाजपाचा सामना महाविकास आघाडीतील शिवसना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांशी होणार आहे. त्रिकोणी खिंडीत सापडलेल्या भाजपाला शहरात वर्चस्व मिळविण्यासाठी कडवी लढत द्यावी लागणार आहे. या लढतीमधील प्रमुख आव्हान म्हणजे, सर्वच प्रभागात सक्षम उमेदवाराची निर्माण झालेली गरज आहे. या गरजेतून आता भाजपाने जनसंपर्क असलेल्या उमेदवारांची जुळवाजुळव सुरू केली आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here