दोडामार्ग ; पुढारी वृत्तसेवा : दुचाकी समोर अचानक आलेल्या मुलाला वाचविण्यासाठी दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक लावला व यात दुचाकीवर मागे बसलेली महिला रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाली. लक्ष्मी लक्ष्मण झोरे (45, रा. डिगस- कुडाळ) असे जखमी महिलेचे नाव आहे. ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर उपचार करून पुढील उपचारासाठी तिला गोवा-बांबुळी येथे पाठविण्यात आले.

मंगळवारी दुपारी 1.30 वा.च्या सुमारास अपघात घडला. एक दुचाकीस्वार त्याची मावशी लक्ष्मी झोरे हिला घेऊन दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गावरून दोडामार्गच्या दिशेने येत होता. तो सिद्धिविनायक कॉलनीजवळ आला असता अचानक एक शाळकरी मुलगा धावत राज्यमार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. त्या मुलाला दुचाकी धडकणार म्हणून प्रसंगावधान राखत स्वाराने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे दुचाकीवर मागे एका बाजूने बसलेल्या लक्ष्मी झोरे या रस्त्यावर पडल्या. त्या पाठीमागच्या बाजूने पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला व त्यामुळे बेशुद्ध पडल्या.

नागरिकांनी लक्ष्मी झोरे यांच्या तोंडावर पाणी शिंपडले व त्यांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या शुद्धीत येत नसल्याचे व त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे पाहून एका युवकाने रिक्षा बोलावत त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे पाठविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here